अमरावती : विधानसभा निवडणुकीदरम्यान जिल्ह्यात महायुतीतील घटक पक्षांमधील बेबनाव उघडपणे समोर आला. पण, आता सत्ता स्थापनेनंतर देखील ही धुसफूस सुरूच आहे. दर्यापूर विधानसभा मतदारसंघातील शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार अभिजीत अडसूळ यांना पराभव पत्करावा लागला. यात महायुतीतील घटक असलेल्या युवा स्वाभिमान पक्षाचे आमदार रवी राणा यांनी अडसूळ यांच्या विरोधात उमेदवार दिल्याने अडसूळ यांचा पराभव झाल्याची खंत शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते अजूनही व्यक्त करतात. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी विविध पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली असताना पुन्हा एकदा महायुतीतील संघर्ष पुन्हा एकदा उफाळून येण्याची शक्यता आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेना शिंदे गटाच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना अभिजीत अडसूळ यांनी राणा दाम्पत्याचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. अभिजीत अडसूळ म्हणाले, महायुतीत तोंड दाबून बुक्क्यांचा मार सुरू आहे. आमच्या पक्षश्रेष्ठींनी कुणाच्याही विरोधात बोलू नका, असे आम्हाला सांगितले होते. पण, आमच्या विरोधात मित्रपक्षानेच उमेदवार दिला. उमेदवाराला पक्षातून काढल्या गेले, पण त्यांचा प्रचार करणाऱ्या स्टार प्रचारक, आमदार किंवा पदाधिकाऱ्यांवर कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही. लोकांमध्ये त्यावेळी महायुतीचा नक्की उमेदवार कोण, याविषयी चुकीचा संदेश गेला आणि त्याचा फटका आम्हाला बसला. आम्ही विरोधात बोललो असतो, तर संपूर्ण महाराष्ट्रात त्याचा परिणाम झाला असता. महायुतीचे वातावरण बिघडले असते. आम्ही तोड दाबून बुक्क्यांचा मार सहन केला. त्यामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे.

हेही वाचा – वाघाचा अपघातात मृत्यू, आईपासून दुरावला अन्…

हेही वाचा – विकास प्रकल्पांना शेतजमिनी देणारी गावे ओसाड

महापालिकेच्या निवडणुकीच्या तयारीविषयी बोलताना अभिजीत अडसूळ म्हणाले, शिवसेना शिंदे गटाने स्वबळावर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढवाव्यात अशी आमची विनंती राहील. याविषयी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अंतिम निर्णय घेतील. पण पूर्वानुभव लक्षात घेता, आम्ही शांत राहण्याची भूमिका घेतली, तर नुकसान आमचेच होते, हे कार्यकर्त्यांच्या लक्षात आले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आमच्या विरोधात मित्रपक्षांकडून उमेदवार दिले जाणार आणि आम्ही त्यांच्या विरोधात बोलूही शकणार नाही. आम्ही मित्रपक्षांना साथ दिली नाही, तर त्याविषयी संपूर्ण महाराष्ट्रात चुकीचा संदेश जातो. महायुतीला त्रास होऊ नये, म्हणून आम्ही संयमाची भूमिका घ्यायची, मात्र मित्रपक्षांच्या चुकीच्या वागण्यामुळे आम्हाला फटका बसतो. हे कुठपर्यंत सहन करायचे, याचा विचार करावा लागेल.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Abhijeet adsul shivsena amravati indirect comment on ravi rana navneet rana mma 73 ssb