नागपूर : देशात वर्षाला सुमारे १ लाख २० हजार नागरिकांना अंधत्व येते. नेत्रदानाचे प्रमाण कमी असल्याने निम्म्याही नागरिकांचे बुब्बुळ प्रत्यारोपण होत नाही. त्यामुळे प्रत्यारोपणासाठीची प्रतीक्षायादी वाढतच आहे. उद्या २५ ऑगस्टपासून राष्ट्रीय नेत्रदान पंधरवड्याचा शुभारंभ होत असून त्यानिमित्त घेतलेला हा आढावा. नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील नेत्ररोग विभागाच्या विभाग प्रमुख डॉ. मिनल व्यवहारे आणि ज्येष्ठ नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. अशोक मदान या विषयाबाबत म्हणाले, आय बँक असोसिएशन ऑफ इंडियाच्या माहितीनुसार, देशात प्रत्येक वर्षी विविध कारणांनी अंधत्व येणाऱ्या नागरिकांची संख्या १ लाख २० हजारांच्या जवळपास आहे. परंतु नेत्रदान कमी असल्याने ४० ते ५० हजारच बुब्बुळ प्रत्यारोपण होतात.
भारतात आढळणाऱ्या एकूण अंध रुग्णांपैकी ८० टक्के रुग्ण हे ५० वर्षे वा त्याहून कमी वयाचे आहेत. बुब्बुळ दोषामुळे येणाऱ्या अंधत्वाचे संकेत तरुण वयातच मिळतात. अंधत्वाचे मुख्य कारण म्हणजे जीवन घटक अ, रसायनांचा अभाव, जंतू संसर्ग, जन्मजात अंधत्व आहे. करोना काळात बुब्बुळ प्रत्यारोपणाची संख्या आणखी खाली घसरली होती. नंतर ही संख्या वाढली. परंतु आजही करोनापूर्वीच्या तुलनेत नेत्रदानाची संख्या कमी आहे.
हेही वाचा : नागपूर: शिवसेना, शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध खंडणीचा आरोप
राज्यातील प्रतीक्षा यादी आठ हजारांवर
राज्यात २०२२- २३ या वर्षात ६२ हजार ३८५ नेत्रदान नोंदवले गेले. २ हजार ६२ बुब्बुळ प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाल्या. सध्या राज्यात बुब्बुळ प्रत्यारोपणाची प्रतीक्षा यादी ७ हजार ८९१ इतकी आहे. नागपुरातील मेडिकलमध्ये ऑगस्ट २२ ते जुलै २०२३ दरम्यान २९ नेत्रदान झाले. त्यापैकी १६ रुग्णांमध्ये बुब्बुळ प्रत्यारोपित केले गेले. सध्या मेडिकलची प्रतीक्षा यादी ६८ इतकी असल्याचेही डॉ. अशोक मदान म्हणाले.
कृत्रिम बुब्बुळ प्रत्यारोपण यशस्वीता दर कमी
काही ठिकाणी कृत्रिम बुब्बुळाच्या वापराचा प्रयत्न सुरू झाला आहे. परंतु नैसर्गिक म्हणजे नेत्रदानातून मिळालेल्या बुब्बुळाच्या तुलनेत कृत्रिम बुब्बुळ प्रत्यारोपणाचा यशस्वीता दर कमी आहे. विविध संस्था व संघटनांच्या निरीक्षणानुसार, नैसर्गिक बुब्बुळ प्रत्यारोपणातील यशाचा दर ७५ टक्के तर कृत्रिम बुब्बुळ प्रत्यारोपणाच्या यशाचा दर २५ टक्के आहे.