वर्धा: भारताचा पौराणिक इतिहास अभिमानाने हिंदू संस्कृतीत जतन केल्या जात असतो. पौराणिक, प्राचीन, ऐतिहासिक व आता वर्तमान अश्या सार्वकालिक वाटचालीत हे संदर्भ जपल्या गेले असून आजही त्याचे पावित्र्य स्मरून पूजा विधी होत असतात. त्यावर विश्वास ठेवून कार्य केल्या जात असल्याचे श्रद्धाळू सांगतात.
जिल्ह्यात कौडण्यपुर, केळझर, पवनार व अन्य अशी ठिकाणे आहेत. आणखी एक म्हणजे डोहावाले बाबा. त्याठिकाणी मोठा उत्सव होत असतो. श्रीक्षेत्र महाकाली धामतीर्थ येथे हनुमान जयंतीस घट स्थापना होते. पाच दिवसीय नवरात्र उत्सव साजरा केल्या जातो. घट विसर्जन करीत मग सर्व भक्त डोहावाले बाबा ईथे पूजा करतात. या स्थळामागे परंपरा असल्याचे महाकाली देवस्थानचे पं. शंकरप्रसाद अग्निहोत्री सांगतात.
हिंदू धर्म ग्रंथानुसार तीव्र अहंकार असलेला दक्ष हा ब्रहदेव पुत्र एक राजा होता. त्याने एका भव्य यज्ञाचे आयोजन एकदा केले. त्यात जावई भगवान शिव यांना सोडून सर्व देव देवतांना निमंत्रित केले. शिवपत्नी सती यामुळे दुखावली. पण तिने भगवान शिव यांची परवानगी नं घेता यज्ञात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. सती ही शिवाला म्हणाली की यज्ञ, गुरू, पिता व मोठा बंधू यांच्याकडे जाण्यासाठी निमंत्रणाची गरज नसते. सतीने हट्ट केला तेव्हा भगवान शिवाने आपले दोन गण माता सती सोबत पाठविले.
मात्र ती यज्ञात आल्याचे पाहताच दक्षाने शिवाचा अपमान करणे सूरू केले. दक्षाच्या शब्दांनी सती दुखावली. पतीचा अपमान सहन नं झाल्याने तिची असहाय्य असल्याची भावना झाली. तिने पवित्र अग्नित जाळून घेत जीवन संपविण्याचा निर्णय घेतला. सतीच्या मृत्यूची माहिती ऐकताच शिव क्रोधित झाले. दक्षाला शिक्षा करण्यासाठी सोबत गेलेल्या दोन गणांना त्यांनी आदेश दिला. गणांनी मग यज्ञ नष्ट करीत दक्षाचा शिरच्छेद केला. त्या दोन गणांपैकी एक म्हणजे डोहावाले बाबा व दुसरे म्हणजे कुंवारा भिवसेन.
अशी आख्यायिका पौराणिक काळापासून चालत असल्याचे पं. अग्निहोत्री सांगतात. भिवसेन बाबा मंदिराच्या सौंदर्यकरणांस त्यांनी देणगी देत फलक लावला होता. पण तो काढून टाकण्यात आल्याने भक्त मंडळी नाराजी व्यक्त करतात. भक्त मंडळीपैकी श्रीराम बांधे, राघोबाजी कोरडे, बाबाराव महाजन, बाबुलाल दिग्रसे, चंद्रभान आसोले, अनिल बोडखे, गजानन पोकळे, गणेश काळे आदिनी फलक परत लावण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे. या डोहावाले बाबा मंदीर पारिसरात होणाऱ्या होम हवन, पूजेत भाविक मोठ्या प्रमाणात सहभागी होतात.