भंडारा : एमपीएससी पूर्व परीक्षेतील पेपरफूट अफवा प्रकरणातील वरठी ( जि. भंडारा )येथील योगेश वाघमारे याला पोलीसांनी ताब्यात घेतले तर प्रदीप कुलपे आणि आशीष कुलपे हे दोघे भाऊ फरार आहेत. त्यापैकी एकाचा दोन वर्षांपूर्वी झालेल्या कोतवाल भरती प्रकरणातही सहभाग असल्याचे उघड झाले आहे.
२०२३ मध्ये झालेल्या कोतवाल भरती आणि पोलीस पाटील भरती प्रक्रियेत तुमसर तालुक्यात मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार होत असल्याचा आरोप एआयएसएफचे महाराष्ट्र राज्याध्यक्ष वैभव चोपकर यांनी केला होता. त्याचवेळी नाकाडोंगरी येथील एका महिला परीक्षार्थीच्या नवऱ्याला फोन करून ‘कोतवाल भरती परीक्षेच्या निकालात नाव पुढे करून देण्याचे आमिष देणाऱ्या एका एजंटची ऑडिओ क्लिप ‘लोकसत्ता’च्या हाती लागली. ध्वनिफीत ९ जून २०२३ रोजी वृत्तासह प्रसारित करताच खळबळ उडाली होती. हा एजंट कोण ? याचा मुख्य सूत्रधार कोण? तालुक्यात आणि जिल्ह्यात अशाप्रकारे आर्थिक व्यवहारातून किती जणांची नियुक्ती करण्यात आली, असे अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते.
त्यावेळी गोबरवाही पोलिसांनी एजंटला शोधून काढले होते आणि तो एजंट नसून वरठी येथील एक भाजीविक्रेता असल्याचे पोलीस तपासात पुढे आले होते. प्रदीप कुलपे असे या भाजीविक्रेत्याचे नाव असून सुनील अत्रे याच्या मोबाईलवरून कॉल करून त्याने पैशांची मागणी केल्याचे त्याने कबूल केल्याचेही पोलिसांनी सांगितले होते. मात्र या प्रकरणाची गांभीर्याने दखल न घेता कुलपे याला थातूरमातूर कारवाई करून सोडून देण्यात आले. त्यामुळे प्रदीप कुलपे याला रान मोकळे झाले होते. आता एमपीएससी प्रकरणात त्याचे नाव आले आहे.प्रदीप कुलपे सध्या फरार आहे. मात्र प्रदीप कुलपे हा केवळ एक दलाल असून त्याचा मुख्य सूत्रधार अजूनही पोलिसांच्या सापडला नाही.
प्रदीप कुलपे आणि आशिष कुलपे हे दोघे भाऊ असून त्यांचा सहकारी वाघमारे याला पोलिसांनी ताब्यात घेताच ते दोघे फरार झाले. कुलपे यांची एक महिला नातेवाईक प्रशासकीय पदावर कार्यरत असून तीच या प्रकरणी आणि कोतवाल भरती प्रकरणात मुख्य सूत्रधार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. प्रदीप कुलपे याचा शोध लागल्यास दोन वर्षांपूर्वीच्या कोतवाल भरती घोटाळ्यातील काही जणांचे पितळ उघडे पडणार असल्याची शक्यता आहे.