देशातील सरकारी कंपन्या विकण्याची मोहीमच केंद्र सरकारने उघडली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा हे दोन गुजराती या कंपन्या विकताहेत, तर अदानी व अंबानी हे दाेन गुजराती त्या खरेदी करताहेत. खासगीकरणाच्या माध्यमातून सरकारी नोकऱ्या घालवण्याचे काम केले जात आहे. बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर वाढत चालली आहे. अदानी तर रेल्वे देखील खरेदी करायला निघाले आहेत. देशाला उद्ध्वस्त करण्याचे काम सुरू आहे, अशी टीका समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांनी सोमवारी येथे पत्रकारांशी बोलताना केली.
अबू आझमी म्हणाले, ‘हिंदुस्थान ॲन्टीबॉयेटिक, एलआयसी सारख्या कंपन्या विकल्या जात आहेत. सरकारी नोकऱ्या संपवून तरुणांना करार पद्धतीच्या नोकऱ्यांमध्ये जुंपले जात आहे. अदानी आणि अंबानी यांचे हित साधण्यासाठी शेतकऱ्यांना देशोधडीला लावले जात आहे. भाजप सरकारने गेल्या आठ वर्षांमध्ये काहीही केलेले नाही. कुठल्याही मालमत्ता उभ्या केल्या नाहीत, जे आहे ते विकण्याचा सपाटा लावला आहे.
काँग्रेस पक्ष हा देशपातळीवर भाजपला टक्कर देऊ शकणारा एकमेव पक्ष आहे, पण या पक्षाची शक्ती आता क्षीण झाली आहे. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाची वाढ होताना दिसत नाही. या पक्षाची ताकद वाढली पाहिजे, अशी आमचीही इच्छा आहे. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे, गर्दी तर चांगली होत आहे, अशी प्रतिक्रिया अबू आझमी यांनी नोंदवली.
हेही वाचा: ‘हर हर महादेव’ चित्रपटातून शिवरायांचे चारित्र्यहनन : नाना पटोले
देशात आज नवीन संविधान लिहिले जात आहे, अल्पसंख्याकांना त्यांच्या मूलभूत हक्कांपासून डावलले जात आहे. हिंदुत्वाच्या नावावर ध्रुवीकरणाचे राजकारण भाजप करीत असून ‘एमआयएम’सारखे पक्ष त्यांना आपल्या जहाल वक्तव्यांमधून मदत करण्याचेच काम करीत आहेत, असेही अबू आझमी म्हणाले.
हेही वाचा: चंद्रपूर : ‘संपूर्ण महाराष्ट्रातच दारूबंदी करा’ विजय वडेट्टीवार यांची मागणी
अपप्रचार करून अल्पसंख्याकांना लक्ष्य केले जात आहे
भारताच्या कायद्यानुसार १८ वर्षांवरील सज्ञान तरुण-तरुणीला कुठल्याही धर्म-जातीचा जोडीदार निवडण्याचा अधिकार बहाल केला आहे, पण केवळ अपप्रचार करून काही लोक अल्पसंख्याकांना लक्ष्य करीत आहेत. ‘लव्ह जिहाद’ नावाची कुठलीही संकल्पना अस्तित्वात नाही. केवळ अपप्रचार केला जात आहे. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी देखील ‘लव्ह जिहाद’च्या नावावर पोलीस ठाण्यात गोंधळ घातला होता, पण संबंधित तरुणीने आपण स्वत: घरातून निघून गेल्याचे सांगितल्यानंतर त्या तोंडघशी पडल्या होत्या. अल्पसंख्याक समुदायाला लक्ष्य करून मतपेटीचे राजकारण करण्याचा हा भाजपचा प्रयत्न आहे, असे अबू आझमी म्हणाले.