नागपूर : आमदार डॉ. वजाहत मिर्झा यांच्या नावाने धमकावत नागपूर (शहर) आरटीओ अधिकाऱ्याकडून २५ लाख रुपये लाच घेण्याच्या प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंध विभागाने (एसीबी) मंत्रालयात वावर असलेल्या सुरेश बुंदेलेची बुधवारी कसून चौकशी केली. सलग तीन दिवस ही चौकशी चालणार आहे. बुंदेले या प्रकरणाशी संबंधित लोकांशी संपर्कात असल्याचे ‘लोकसत्ता’ने पुढे आणले होते.
हेही वाचा – नागपूर : लग्न जुळत नसल्याने मुलाने केली बापाला मारहाण
उपराजधानीत २८ मार्चला नागपूर शहर आरटीओ अधिकाऱ्याकडून २५ लाख रुपयांची लाच घेताना दिलीप खोडे याला एसीबीने अटक केली. खोडे सातत्याने मंत्रालयात वावर असलेल्या लक्ष्मण खाडे आणि सुरेश बुंदेले यांच्या संपर्कात होते. त्यामुळे या तिघांच्या संबंधांची ‘एसीबी’कडून चौकशी होणार का, हा प्रश्न ‘लोकसत्ता’ने उपस्थित केला होता. त्यानंतर ‘एसीबी’ने सुरेश बुंदेले याला चौकशीला बोलावून त्याची बुधवारी चौकशी सुरू केली आहे. सुमारे तीन दिवस ही चौकशी चालण्याची शक्यता आहे. बुंदेले यांच्या चौकशीच्या वृत्ताला एसीबीचे पोलीस अधीक्षक राहुल माकणीकर यांनी दुजोरा दिला.