अमरावती : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्‍या अधिकाऱ्यांनी आपली चौकशी केली खरी, पण त्‍यांची सामान्‍य प्रश्‍नावली पाहून आश्‍चर्यच वाटले. खरे तर त्‍यांनी मी गुवाहाटीला विमानाने गेलो, चार्टर विमानाचा प्रवास खर्च कसा केला, याची चौकशी करायला हवी होती, आपण त्‍यांना सविस्‍तर माहिती दिली असती, असा टोला शिवसेनेच्‍या ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी लगावला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

देशमुख यांची येथील ‘एसीबी’ कार्यालयात सुमारे अडीच तास चौकशी करण्‍यात आली. त्‍यानंतर त्‍यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आपल्‍या विरोधात ‘एसीबी’कडे खोटी तक्रार देण्‍यात आली. हे एक षडयंत्र आहे. आपल्‍याला चौकशीसाठी हजर राहण्‍याविषयी नोटीस बजावण्‍यात आली होती. आपण कुठल्‍याही चौकशीला घाबरणार नाही. चौकशीला आज सामोरा गेलो, पण एसीबीच्‍या अधिकाऱ्यांनी आपण वाहनात डिझेल कुठून भरता, यासारखे सामान्‍य प्रश्‍न विचारले. हे आपल्‍यासाठी आश्‍चर्यच होते. खरे तर आपण जेव्‍हा सुरतहून गुवाहाटीला गेलो, तेव्‍हा चार्टर विमाने दिमतीला होती. हा खर्च कसा केला, याची विचारणा एसीबीने करायला हवी होती, असे देशमुख यांनी प्रसार माध्‍यमांशी बोलताना सांगतिले.

हेही वाचा >>> तीन तासांच्या ACB चौकशीनंतर नितीन देशमुखांचा भाजपावर गंभीर आरोप; म्हणाले, “२४ मराठी लोकांवर दबाव टाकून…”

विरोधी पक्षातील लोकांच्‍या विरोधात जाणीवपूर्वक मोहीम

‘इडी’, ‘सीबीआय’, ‘एसीबी’च्‍या माध्‍यमातून मराठी लोकांनाच लक्ष्‍य केले जात असून आतापर्यंत २४ मराठी माणसांवर कारवाई झाली आहे किंवा त्‍यांना नोटीस बजावण्‍यात आली आहे. विरोधी पक्षातील लोकांच्‍या विरोधात सत्‍ताधारी नेत्‍यांनी जाणीवपूर्वक मोहीम उघडल्‍याचे दिसून येत आहे. आरोप करणाऱ्यांमध्‍ये निवडक हिंदी भाषिक लोक आहेत. राणा दाम्‍पत्‍य, किरीट सोमय्या, मोहित कंबोज यासारखे लोक चुकीचे आरोप करीत सुटले आहेत. या सर्वांच्‍या पाठीशी उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. हे त्‍यांचेच कारस्‍थान आहे, असा आरोप नितीन देशमुख यांनी केला.

रवी राणांच्या मालमत्तेची चौकशी करा

भाजपाचे अनेक नेते भ्रष्‍टाचारी आहेत, पण त्‍यांची चौकशी केली जात नाही. आमदार रवी राणा यांचे वडील बारदाना विकत होते. राणा यांच्‍याकडे कुठून एवढी मालमत्‍ता आली, याचीही चौकशी झाली पाहिजे, असे नितीन देशमुख म्‍हणाले. राणा दाम्‍पत्‍य सातत्‍याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्‍यावर टीका करीत आहेत. हे जर असेच सुरू राहिले, तर आम्‍ही देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या विरोधात बोलण्‍यास मागेपुढे पाहणार नाही, असा इशारा नितीन देशमुख यांनी दिला. गेल्‍या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेमुळे विदर्भात भाजपला दोन अंकी संख्‍या गाठता आली. ते यावेळी एका अंकात येतील, असा दावा त्‍यांनी केला.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Acb to probe guwahati air travel mla nitin deshmukh deputy chief minister intrigue mma 73 ysh