नागपूर : शिवसेनेच्या चिन्हाचा वाद निवडणूक आयोगासमोर आहे. त्यामुळे मला त्यावर प्रतिक्रिया देण्याचे कारण नाही. निवडणूक आयोग या संदर्भातला निर्णय घेईल. मात्र जो काही निर्णय दिला जाईल तो राजकीय पक्षांनी मान्य करावा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. भटक्या विमुक्त जमाती संघटनेच्या अधिवेशनासाठी पवार शनिवारी नागपुरात आले असता ते विमानतळावर प्रसार माध्यमांशी बोलत होते. 

ज्या एस. टी. कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले होते त्यांना पुन्हा कामावर घेण्याबाबतचा निर्णय सरकारचा आहे. तो सरकारने घ्यावा, असेही ते म्हणाले. नाशिकमध्ये झालेली घटना दु:खद आहे. सरकारच्या वतीने चौकशी सुरू आहे, चौकशीनंतर कारण समोर येतील. जे जखमी आहेत त्यांना लवकरात लवकर वैद्यकीय मदत कशी देता येईल यासाठी राज्य सरकारची यंत्रणा कार्य करत आहे. 

सरसंघचालकांचे वक्तव्य समाधानाची बाब

सरसंघचालक मोहन भागवत यांनी नागपुरात एका कार्यक्रमादरम्यान केलेले वक्तव्य मी पण वाचले आहे. समाधानाची बाब आहे. समाजाच्या एका मोठय़ा वर्गाला काही पिढय़ा ज्या यातना सहन कराव्या लागल्या आणि त्याच्या संदर्भातील जबाबदारी ज्यांच्याकडे आहे, त्या घटकांना त्याची जाण व्हायला लागली आहे. मात्र नुसते माफी मागून चालणार नाही. पुढे प्रत्येक व्यवहारांमध्ये या सगळय़ा वर्गाची दखल कशी घेतली जाईल, यावर सगळे अवलंबून असल्याचे पवार म्हणाले.

Story img Loader