नागपूर : कार चालवताना चालकाला डुलकी लागल्यामुळे मामाचे कुटुंब उद्ध्वस्त झाले. त्यामुळे व्यथित झालेल्या १६ वर्षीय मुलाने अपघात मुक्त ‘स्मार्ट कार मॉडेल’ तयार केले. या मॉडेलमुळे चालकाला डुलकी आल्यास ‘सेंसर आलार्म’ वाजेल तर ‘ओव्हरटेक’ करतानाही कारमधून सरकता कॅमेरा बाहेर येऊन चालकाला समोरील वाहनाचा वेध घेता येईल. हे मॉडेल आसाम राज्यातील ईलियास हुसैन या विद्यार्थाने बनवले आहे.
अपघातासाठी अनेक कारणे कारणीभूत आहेत. त्यात झोपेची हलकिशी डुलकी बऱ्याचदा अपघाताला कारणीभूत ठरते. तसेच समोरील वाहनाला ओव्हरटेक करताना समोरून येणारे वाहन धडकल्यानेही अपघातात मृत्यू होण्याचे प्रमाण मोठे आहे. त्यामुळे अपघातावर नियंत्रण मिळवण्यासाठी देश-विदेशातील वैज्ञानिक-संशोधक नवनवीन तंत्रप्रणाली तयार करीत आहेत.
हेही वाचा >>> आता रेशन दुकानातही बेरोजगारांची नोंदणी होणार, ‘रोजगारी’ ॲप विकसित
आसाम राज्यातील गोअलपारा जिल्ह्यात फतेंगापारा हायस्कूलमध्ये नववीत शिकणाऱ्या विद्यार्थी इलियास हुसैन याने ‘ॲक्सीडेंट फ्री स्मार्ट कार’ मॉडेल तयार केले. दोन वर्षांपूर्वी इलियासच्या मामाचे कुटुंब कार अपघातात ठार झाले. त्यामुळे व्यथित झालेल्या इलियासने अपघात होऊ नये म्हणून शिक्षक, वृत्तपत्र आणि इंटरनेटच्या माध्यमातून संशोधन केले. त्याला शिक्षक मोक्तासीदू झमन आझाद यांनी प्रोत्साहन दिले. इलियासने तयार केलेल्या ‘ॲक्सीडेंट फ्री स्मार्ट कार’च्या मॉडेलमध्ये वेगवेगळ्या ‘सेंसर’चा आणि ‘आय कॅमेरा’चा वापर केला आहे. चालकाला झोप येऊ नये म्हणून कॅमेऱ्यात डोळ्यांच्या हालचाली टिपल्या जातात. चालकाला डुलकी लागल्यास कारमध्ये जोरात अलार्म वाजेल.
हेही वाचा >>> मुलांचे मन वाचणारे ‘ॲप’, हट्टीपणा, अभ्यासाचा कंटाळा पळवणार
‘ओव्हरटेक’चा धोका टळणार
‘स्मार्ट कार’च्या हेडलाईटमध्ये सरकता कॅमेरा आणि सेंसर लावला आहे. कोणत्याही वाहनाला ‘ओव्हरटेक’ करताना समोरील वाहनाची धडक लागू नये म्हणून हा कॅमेरा तीन ते चार फूट बाहेर निघेल. त्यामध्ये समोरून वाहन येत आहे काय?, याचे चित्र कारमधील स्क्रिनवर दिसेल. तसेच कारच्या मागे किंवा पुढे असलेल्या वाहनाचे अंतरही स्क्रिनवर स्पष्ट दिसेल. त्यामुळे ‘ओव्हरटेक’ करताना अपघात होण्याचा धोका ओळखता येणार आहे.
झोपेमुळे सर्वाधिक रस्ते अपघात
जवळपास ५२ टक्के अपघात चालकाच्या डुलकीमुळे होतात. महामार्गावरील ४० टक्के अपघातांना नीट झोप न घेणारे चालक जबाबदार आहेत. तर ३२ टक्के अपघात निष्काळजीपणे ओव्हरटेक केल्यामुळे होतात. ‘स्मार्ट कार मॉडेल’मुळे अपघातावर नियंत्रण मिळवण्यात बऱ्यापैकी यश मिळणार असल्याची प्रतिक्रिया बालसंशोधक इलियास हुसैन याने दिली.