बुलढाणा: तरुणाईच्या हातात विदेशी बनावटीच्या दुचाकी आल्यापासून वाहन अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. वर्षाकाठी हजारो जणांचा यात बळी जातो तर हजारो जायबंदी होतात, काही दुर्दैवी जीवांना कायमचे अपंगत्व येते.
बुलढाणा जिल्ह्यातील चिखली नगरीत आज मंगळवारी, २९ एप्रिल रोजी दुपारी झालेल्या भीषण दुर्घटनेत एका युवकाचा मृत्यू झाला. दुसरा युवक गंभीर जखमी झाला असून मृत्यूशी झुंज देत आहे. खामगाव जालना वळणा( बायपास) जवळील पुंडलिक नगरच्या कमानीजवळ हा अपघात झाला. विरुद्ध दिशेने येणाऱ्या ( एम एच २१ सीई ६७५९ आणि एम एच २८ एई ४२२१ क्रमांकाच्या ) दुचाकी समोरासमोर धडकल्या. ही धडक इतकी जोराची होती की, एका दुचाकी वाहनावरील युवक मेंदूला दुखापत झाल्याने जागीच दगावला.
पृथ्वीराज सुरडकर (२०, राहणार सोमठाणा, तालुका चिखली, जिल्हा बुलढाणा) असे अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे. पृथ्वीराज सुरडकर हा चिखली शहरातील एका खाजगी रुग्णालयात कामाला होता. जेवणाचा डब्बा आणण्यासाठी तो जात होता. त्याचवेळी दुसऱ्या मोटारसायकशी त्याची धडक झाली. त्याच्या डोक्याचा मागील बाजूस मार लागल्याने त्याचा जागीच करुण अंत झाला.
दुसऱ्या दुचाकीवरील ओम प्रकाश इंगळे यालाही गंभीर दुखापत झाली. त्याच्यावर चिखली शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघाताची माहिती मिळताच भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी दत्ता सुसर घटनास्थळी दाखल झाले. उप प्रादेशिक परिवहन विभागाच्या चमुने देखील घटनास्थळ गाठले. या सर्वांनी मिळून गंभीर जखमीना खाजगी रुग्णालयात दाखल केले.
या घटनेने चिखली शहर परिसर आणि तालुक्यातील सोमठाणा परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पृथ्वीराजच्या अपघाती निधनाचे वृत्त येऊन धडकताच सोमठाणा गावात एकच खळबळ उडाली. शव विच्छेदन झाल्यावर पृथ्वीराजचा मृतदेह त्याच्या नातेवाईकांच्या सुपूर्द करण्यात येणार असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.