अमरावती: टपाल कार्यालयाने टाटा एआयजी आणि बजाज अलायन्स या दोन विमा कंपन्यांसोबत एकत्रित येऊन अपघात विमा योजना आणली आहे. या दोन्ही योजना मिळून ७९५ रुपयांचा हप्ता भरून टपाल विभागाकडून हा अपघात विमा उतरवण्यात येत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १९ हजारांहून अधिक नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतला असून, यातील सात ते आठ लाभार्थींना किरकोळ अपघातानंतर उपचारासाठी विम्याचा लाभ मिळाला.
अचानक अपघात झाल्यावर एखाद्या व्यक्तीवर अथवा त्यांच्या कुटुंबीयांवर मोठा आघात होतो. उपचाराचा खर्च कोठून करायचा असा प्रश्न उभा राहतो. यासाठी टपाल खात्याने कमी पैशांत टाटा एआयजी आणि बजाज अलायन्स या दोन विमा कंपन्यांसोबत एकत्रित विमा योजना आणली आहे. यामध्ये टाटा एआयजी ३९९ रुपये आणि बजाज अलायन्स ३९६ रुपये असा एकूण ७९५ रुपयात हा विमा काढण्यात येत आहे.
हेही वाचा… तलाठी भरतीत ‘सेटींग’ होईल का? उमेदवारांकडून विचारणा; १९ लाखांचा दर अन्…
टपाल विभागाकडून विमा काढलेल्या व्यक्तीचा अपघातात मृत्यू झाल्यास या दोन्ही कंपन्यांकडून प्रत्येकी दहा लाख रुपयांचा विमा संबंधित व्यक्तीच्या कुटुंबीयांना दिला जातो. तसेच व्यक्तीला अपघातामध्ये कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास किंवा एक हात, पाय गमवावा लागला असेल, तरीही दोन्ही कंपन्यांकडून प्रत्येकी दहा लाखांपर्यंत लाभ दिला जातो. अपघात घडल्यानंतर वैद्यकीय खर्चाच्या देयकासोबत विमा कंपनीकडे अर्ज करावा लागतो. रुग्णालयाचा संपूर्ण लेखी तपशील मूळ कागदपत्रांसह विमा कंपनीकडे सुपूर्द करावा लागतो.
आवश्यक कागदपत्रे
या विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणत्याही प्रकारची कागदपत्रे जमा करण्याची गरज नाही. पेपरलेस पद्धतीने विम्याचा फॉर्म भरून घेतला जातो. फक्त आधार कार्ड, पॅन कार्ड दाखवावे लागतात. तसेच नॉमिनीचे पूर्ण नाव, जन्मतारीख व वैध ई-मेल आयडी आवश्यक आहे.