नागपूर : शेकडो विद्यार्थी एकाच वेळी शाळेच्या प्रवेशद्वारावर गर्दी करतात, त्यामुळे वाहतूक कोंडी होते. याचा त्रास सामान्य नागरिकांना होतो. मात्र, यावर शाळा प्रशासन आणि वाहतूक पोलीस कोणताही पर्याय शोधत नाही. त्यामुळे रामेश्वरी रोडवरील इंजिनिअर्स इंग्लिश स्कूलसमोर नेहमी अपघाताचा धोका कायम आहे.

अजनी पोलीस ठाण्याच्या बाजूने जाणाऱ्या रामेश्वरी रोडवरील पहिल्याच चौकात इंजिनिअर्स इंग्लिश स्कूल असून येथे नर्सरी ते बारावीपर्यंतचे विद्यार्थी शिकतात. रामेश्वरी रोड हा शताब्दी चौक, वर्धा रोड, बेसा, बेलतरोडी, हुडकेश्वरकडे जाणाऱ्यांसाठी मुख्य मार्ग असल्याने सर्वाधिक वर्दळ तेथे असते. रस्त्यावरच इंजिनिअर्स शाळा आहे.

तेथे विद्यार्थ्यांसाठी मैदान नाही तसेच सायकली, वाहने ठेवण्यासाठी पुरेशी जागाही (वाहनस्थळ) नाही. त्यामुळे शाळेतील विद्यार्थी त्यांच्या सायकली थेट पदपथावर ठेवतात. त्यामुळे रस्त्याने चालणाऱ्यांची अडचण होऊन त्यांना पदपथाच्या खाली उतरून रस्त्यावरून मार्गक्रमण करावे लागते. तसेच या शाळेत विद्यार्थ्यांची संख्या अधिक असल्यामुळे सकाळी नऊ वाजता शाळा सुरू होते व दुपारी दोन वाजता ती सुटते, या वेळेत शाळेसमोरील रस्त्यावर मोठी गर्दी होते. त्यामुळे या मार्गावरील वाहतुकीवर परिणाम होतो, वाहतूक कोंडी होते.

अनेकदा भरधाव आणि अनियंत्रित वाहनांमुळे विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका निर्माण होतो. या गंभीर समस्येकडे पालक व शाळा प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यायला हवे. तसेच वाहतूक पोलिसांनीसुद्धा संभाव्य धोका लक्षात घेता विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी सजग राहायला हवे. शाळेसमोर अधिकृत ‘पार्किंग’चा फलक असल्यामुळे सामान्य नागरिकसुद्धा शाळेसमोर त्यांची वाहने उभी करतात. त्यामुळे विद्यार्थ्यांची उभे राहण्याची हक्काची जागासुद्धा वाहनांनी व्यापली जाते.

गजबजलेल्या रस्त्यामुळे विद्यार्थी असुरक्षित

इंजिनिअर्स शाळेच्या आजूबाजूला बरीच रुग्णालये, औषधांची दुकाने, मॉल आणि किराणा दुकाने आहेत. शाळेला लागून असलेल्या मॉलमध्ये येणारे ग्राहक शाळेच्या समोरील पदपथावर वाहने उभी करतात. त्यामुळे शाळा सुटल्यावर विद्यार्थ्यांना पालकांची वाट बघत रस्त्यावर थांबावे लागते. विद्यार्थ्यांच्या रस्त्यावरील गर्दीमुळे नेहमी कोंडी निर्माण होते. अद्यापपर्यंत यावर पोलिसांना तोडगा काढता आला नाही.

शाळेला ऑटो, हातठेल्यांचा वेढा

इंजिनिअर्स शाळेसमोरच प्रवाशांसाठी ऑटो उभे असतात. तसेच प्रवासी शाळेसमोर ऑटो आणि बसची वाट बघत असतात. तसेच शाळेचे प्रवेदशद्वार रस्त्यालगतच असल्यामुळे हातठेल्यांचा वेढा आहे. या दुकानांमुळे रिंगरोडवरून धावणारी वाहने अगदी शाळेच्या प्रवेशद्वाराजवळून भरधाव निघून जातात. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून पूर्वनियोजन करावे. वाहतूक पोलिसांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य द्यायला हवे. शाळा सुटण्याच्या वेळात पोलिसांची गस्त असावी. – मेघा काळे (वस्तीतील नागरिक)

असतात. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसंदर्भात पालक, शिक्षकांना सूचना देण्यात येतात. रस्त्यावर वाहतूक पोलिसांची नेहमी गस्त असल्याने वाहतुकीची कोंडी काही मिनिटांतच दूर केली जाते. – माधुरी बाविस्कर, सहायक पोलीस आयुक्त, वाहतूक शाखा.