लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गोंदिया : गोवंशाची तस्करी करणारा ट्रक रस्त्यावर उलटला. यामुळे घडलेल्या अपघातात ३५ जनावरे ठार झाली. ही घटना आज बुधवार ५ फेब्रुवारी २०२५ रोजी गोंदिया जिल्ह्यातील चिचगड पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या कोरची – चिचगड मार्गावरील डासगड घाटावर मध्य रात्री सुमारास घडली. अपघात घडल्यानंतर ट्रकचालक पसार झाला असता चिचगड पोलिसांनी त्या वाहन चालकाला सकाळच्या सुमारास ताब्यात घेतले. गोवंशीय ३५ जनावरे घेऊन जाणारा एम.एच. ३० बीडी १०९५ क्रमांकाचा ट्रक कोरची ते चिचगड मार्गाने जात होता. डासगड प्रवेश द्वारा समोरील घाटाच्या वळण रस्त्यावर ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रक उलटला.

या अपघातात ट्रक मध्ये असलेली ३५ जनावरे जागीच ठार झाली तर काही जनावरे जखमी झाली आहेत. ट्रकच्या केबिनमध्ये रक्ताचे डाग आढळल्याने ट्रक चालक ही जखमी झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. सदर ट्रक अपघात या घटनेची माहीती चिचगड पोलिसांना देण्यात आली आहे. तर चिचगड मार्गे ही जनावरे कुठुन आणून वाहतूक केली जातात याचा तपास आता चिचगड पोलिस करीत आहेत. यात विशेष म्हणजे गोंदिया तालुक्यातील चंगेरा या गावातून पण मोठ्या प्रमाणात गोवंश तस्करी करून याच चिचगड – ककोडी – कोरची मार्गे हैदराबादला पाठविले जातात. यातील गोवंश तस्कर कधी पोलिसांच्या तावडीत सापडतात तर कधी पळून जातात मध्यरात्रीच्या सुमारास ही तस्करी होत असल्यामुळे पोलिसांना कारवाई करण्यात अडचण निर्माण होते.

देवरी तालुक्यातील चिचगड पोलिस ठाणे अंतर्गत अवैध जनावरे वाहतूक करणाऱ्या वाहनावर मागील जानेवारी महिन्यामध्ये तीन कार्यवाया झालेल्या आहेत. बुधवारी सकाळी या घटनेची माहिती मिळताच घटना स्थळ गाठून चिचगड पोलिसांनी कारवाई केली आहे. पण चिचगड पोलिस स्टेशन छत्तीसगड व गडचिरोली</p>

जिल्ह्याला लागुन असल्याने मध्यरात्री दरम्यान येथून अवैध जनावरे वाहतुक छुप्या मार्गाने ही होते. सदर भाग नक्षल प्रभावित असल्याने कारवाई करण्यास दोन्ही जिल्ह्यांना अडचणी निर्माण होते तरी ही गोंदिया जिल्ह्यात चिचगड पोलिस स्टेशन हे अवैध गोवंश वाहून नेणाऱ्या वाहनावर कारवाईत अग्रेसर आहेच. वाहनचालकाला ताब्यात घेत गुन्हा दाखल केला असल्याची माहिती चिचगड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक तुषार काळेल यांनी लोकसत्ता सोबत बोलताना दिली.