लोकसत्ता टीम
भंडारा : मेहुणीच्या लग्नासाठी सासुरवाडीकडे येत असलेल्या जावयाचा वाटेतच अपघाती मृत्यू झाल्याची घटना काल रात्री सावरगाव फाट्याजवळ घडली. राहुल वसंतराव मिसार (वय ३८) असे मृताचे नाव आहे. जावयाच्या अपघाताची बातमी कळताच लग्नघरातील आनंदी वातावरणावर विरजण पडले.
लाखांदूर तालुक्यातील आथली येथील सासुरवाडीत लग्नकार्यासाठी येत असलेल्या राहुल मिसार यांचा अज्ञात वाहनाच्या धडकेत जागीच मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि.२४) रात्री ८ वाजताच्या दरम्यान लाखांदूरजवळील सावरगाव फाट्यासमोर घडली. राहुल मिसार चंद्रपूर जिल्ह्यातील पिंपळगाव (भोसले) येथील रहिवासी आहेत.
राहुल मिसार यांची लाखांदूर तालुक्यातील आथली ही सासुरवाडी असून प्रेमराज ठाकरे यांचे ते जावई होते. प्रेमराज ठाकरे यांच्या लहान मुलीचे मंगळवारी (ता. २५) लग्न होते. सोमवारी हळदीचा कार्यक्रम होता.
रात्री ७.३० वाजता राहुल मिसार हे आथलीवरून स्कुटीने लाखांदूरला येत असताना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. धडक देताच अज्ञात वाहनचालक वाहनासह पसार झाला. घटनेची माहिती लाखांदूर पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय लाखांदूर येथे पाठविला.