नितीन पखाले
भारताचे संविधान, येथील लोकशाही यावर विश्वास असलेले सुज्ञ मतदार एके दिवशी आपल्यासारख्या कफल्लक उमेदवारालाही लोकप्रतिनिधी म्हणून संधी देतील, हे स्वप्न पाहून ‘ते’ तब्बल ३० पेक्षा अधिक निवडणुका लढले. प्रत्यक्षात ‘ते’ कधी लोकप्रतिनिधी झालेच नाही, मात्र लोकांचा ‘आमदार’ म्हणून त्यांनी नावलौकिक मिळवले. या लोकांच्या मनातील आमदाराची शनिवारी अपघाती ‘एक्झिट’ झाली आणि त्यांना कधीच मतदान न करणारे मतदारही हळहळले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – नागपूर : कर्ज फेडण्यासाठी केली मित्राच्या घरी चोरी

पुसद तालुक्यातील शेंबाळपिंपरी येथे राहणारे उत्तम भगाजी कांबळे हे जिल्ह्यात ‘आमदार’ या टोपण नावाने प्रसिद्ध होते. एम.कॉम.पर्यंत शिक्षण होऊनही नोकरी न मिळाल्याने गावात तर कधी पुणे, मुंबईत रोजमजुरी करू लागले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला ‘शिका, संघटित व्हा, संघर्ष करा’ हा मंत्र त्यांच्या आयुष्यात नवी दिशा देणारा ठरला होता. संविधानावर श्रद्धा असल्याने उत्तम कांबळे यांनी लोकप्रतिनिधी होऊन समाजाची सेवा करण्याचा निश्चय केला. वयाच्या २५ व्या वर्षी पहिली निवडणूक लढवली आणि पुढे प्रत्येक निवडणूक लढण्याचा जणू छंदच त्यांना जडला. त्यांनी आतापर्यंत तंटामुक्त समिती, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा, लोकसभा अशा तब्बल ३० पेक्षा अधिक निवडणुका लढविल्या. ते प्रत्येक निवडणुकीत पराभूत झाले, मात्र त्यांनी कधीच हार मानली नाही. कोणतीही निवडणूक आली की ते नव्या उमेदीने तिला सामोरे जायचे. उमेदवारीसाठी अनामत रक्कम मित्र, परिचित यांच्याकडून जमा करून भरायचे. त्यांचा निवडणूक खर्च ‘शून्य बजेट’ असायचा. इतक्या निवडणुका लढवूनही एकही रुपया संपत्ती नसल्याचे प्रतिज्ञापत्र मात्र कायम राहिले.

हेही वाचा – नागपूर : ‘यू-ट्युब’ बघून प्रयोग करण्याचा उपद्व्याप विद्यार्थ्याच्या जीवावर बेतला

निवडणुकीचा खर्च घरातील बकऱ्या, कोंबड्या विकून भागवायचे. जे निवडणूक चिन्ह मिळेल ते स्वीकारून सायकल, दुचाकी, बसने गावोगावी फिरून स्वतःच स्वतःचा प्रचार करायचे. त्यांची आई त्यांना शिदोरी बांधून द्यायची.पुसद जिल्हा निर्मिती आणि वेगळा विदर्भ या त्यांच्या प्रमुख मागण्या कायम राहिल्या. एका निवडणुकीदरम्यान उत्तम कांबळे यांच्या उमेदवारीची दखल दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवरील सातच्या बातम्यांत घेतली गेली. तेव्हा एका प्रतिस्पर्धी उमेदवाराने कांबळे आव्हान निर्माण करतील या भीतीतून मतदारांवर लाखो रुपये खर्च केल्याची चर्चा होती. नुकतीच झालेली राष्ट्रपती पदाची निवडणूक लढविण्याची त्यांची तीव्र इच्छा होती. मात्र उमेदवारीसाठी सूचक, अनुमोदक न मिळाल्याने त्यांची ही इच्छा अपूर्ण राहिली.

मतदार कधीतरी उत्तमला निवडून देतील हा भाबडा विश्वास त्यांच्या आईला होता. मात्र, ही अपेक्षा आता कधीच पूर्ण होणार नाही. शनिवारी सायंकाळी पुसद-शेंबाळपिंपरी मार्गावर दुचाकीच्या धडकेत उत्तम कांबळे गंभीर जखमी झाले आणि त्यातच त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने त्यांची आजारी आई एकाकी पडली आहे. कांबळे यांच्या निधनाने लोकांच्या मनातील ‘आमदार’ आता कधीच निवडणूक लढणार नाही, याची रूखरूख सर्वांनाच लागली आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Accidental death of uttam bhagaji kamble of shembalpimpri in pusad taluka amy