राखी चव्हाण
गोंदिया-चांदाफोर्ट रेल्वेमार्गावर वाघिणीच्या तीन बछडय़ांचा मृत्यू झाल्यानंतर जंगलातून आणि जंगलालगतचे मार्ग तसेच प्रकल्पांबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. वन्यप्राण्यांचे भ्रमणमार्ग रेल्वे रुळांमुळेच नव्हे तर राष्ट्रीय महामार्ग आणि कालवे तसेच इतर प्रकल्पांमुळे धोक्यात आले आहेत. या संदर्भात खबरदारीच्या उपाययोजना (मेटिगेशन मेजर्स) करण्याचे केंद्रीय वन्यजीव मंडळ तसेच केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल खात्याने सांगितले. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याने वन्यप्राण्यांचे अपघाती मृत्यू होत आहेत.
जंगलातून जाणारे रेल्वेमार्ग तसेच राष्ट्रीय महामार्ग आणि कालव्यांमुळे वन्यप्राण्यांचे भ्रमणमार्ग खंडित झाले आहेत. गेल्या काही वर्षांत त्यांच्या अपघाती मृत्यूची संख्या वाढली आहे. विकास आवश्यक आहे. बऱ्याच बाबतीत जंगलातून जाणारे मार्ग टाळता येणार नाहीत. मात्र, विकास करताना वन्यप्राण्यांचे मृत्यू होऊ नयेत, म्हणून खबरदारीच्या उपाययोजनाही आवश्यक ठरतात. रेल्वे खात्याने ‘डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर्स’ उभारताना जंगलतोडीचे प्रमाण आणि कॉरिडॉर्समधून जंगलाच्या अन्य भागांत स्थलांतर करणाऱ्या वन्यजीवांचा विचार करावा, अशी सूचना राज्य वन्यजीव मंडळाने केली होती. आजच्या घटकेला २८०० किलोमीटरचे ‘ईस्टर्न आणि वेस्टर्न कॉरिडार्स’ बांधण्यात येत आहेत. त्यासाठी मोठय़ा प्रमाणावर जंगलतोड केली जाणार आहे. रेल्वेरुळाच्या विस्तारीकरणाचा परिणामही जंगलावर होणार आहे. त्यामुळेच अकोला-खंडवा या रेल्वेमार्गाच्या विस्तारीकरणाला विरोध होत आहे. कारण हा मार्ग वन अभयारण्यातून जातो. त्याला पर्यायी मार्ग उपलब्ध असल्यामुळेच वन्यजीवप्रेमींनी या मार्गाला विरोध दर्शवला. त्यामुळे सर्वात आधी पर्यायी मार्ग शोधणे आणि तो उपलब्ध नसल्यास खबरदारीच्या उपाययोजना करणे, हा वन्यजीवांचे मृत्यू रोखण्यामागील पर्याय आहे. रेल्वेच नव्हे, तर राष्ट्रीय महामार्गही वन्यप्राण्यांसाठी कर्दनकाळ ठरत आहे. याच कारणामुळे महाराष्ट्र-मध्य प्रदेश या पेंच व्याघ्र प्रकल्पाला लागून जाणाऱ्या महामार्गाचे विस्तारीकरण त्दहा वर्षांहून अधिक काळ रखडले होते. वन्यप्राणी रात्री संचार करतात. अंधार पडल्यानंतर ते पहाटे उजाडेपर्यंत त्यांच्या हालचालींना वेग येतो. त्यामुळे जंगलातील आणि जंगलालगतचे रस्ते रात्री आठ ते सकाळी सहापर्यंत वाहतुकीसाठी बंद असायला हवेत. मेळघाट व्याघ्र प्रकल्प परिसरातील सेमाडोह-हरिसाल क्षेत्रात रात्री दर दोन तासांनी वाहने सोडली जातात. तर बुलढाण्यातील ज्ञानगंगा अभयारण्यालगतचा रस्ताही रात्री दहा ते सकाळी सहापर्यंत बंद करण्यात येतो. रस्त्यावर गतिरोधक आवश्यक आहेत. भुयारी मार्ग, उड्डाणपूल, कुंपण, वन्यप्राणी संचारमार्ग आणि वाहनांच्या गतीविषयीचे सूचनाफलकही रस्त्यावर असायला हवेत. काही ठिकाणी ते लावले आहेत, पण रात्री कुणीही नसल्याने या फलकांकडे वाहनचालक दुर्लक्ष करतात. ही बाब गांभीर्याने न घेतल्यास हा प्रश्न आणखी गंभीर होण्याचा इशारा वन्यजीवतज्ज्ञांनी दिला आहे. खबरदारीचे उपाय योजले नाही तर जंगलातून जाणारे रेल्वेमार्ग वन्यप्राण्यांच्या मृत्यूचे सापळे ठरण्याची चिन्हे आहेत. गोंदिया-चांदाफोर्ट रेल्वेमार्गावरून आधी एकमेव पॅसेंजर रेल्वे जात होती. या मार्गावरून आता अनेक रेल्वे जातात. आता गडचिरोली ते वडसा हा नवीन रेल्वेमार्ग प्रस्तावित आहे. तो उभारताना खबरदारीच्या उपाययोजना केल्या तर वन्यजीवांची सुरक्षा आणि विकास या दोन्ही गोष्टी साध्य होतील.
उपाययोजनांबाबत सरकार ढिम्म
जानेवारी २०१८ मध्ये केंद्राच्या वन, पर्यावरण आणि हवामान बदल खात्याने जंगलालगत प्रस्तावित प्रकल्पांना खबरदारीच्या उपाययोजना कराव्या लागतील, असे स्पष्टपणे सांगितले होते. केंद्रीय वन्यजीव मंडळाने सुद्धा सर्व राज्यांना वन्यप्राण्यांच्या अधिवासाच्या आड येणाऱ्या रेल्वे तसेच राष्ट्रीय महामार्ग आणि कालवे या रेषीय प्रकल्पादरम्यान खबरदारीच्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, अजूनही राज्य सरकारने त्यावर काहीच हालचाल केलेली नाही.
वडसा-गडचिरोली हा भविष्यातील तर चांदाफोर्ट-गोंदिया हा अस्तित्वातील प्रकल्प आहे. या मार्गावर यापूर्वीही वन्यप्राण्यांचे मृत्यू झाले आहेत. बाजीराव हा वाघ गेल्यावर्षी राष्ट्रीय महामार्गावरच मृत्युमुखी पडला होता. त्यानंतर उपाययोजनांसाठी मंत्र्यांचा आणि तज्ज्ञांचा समावेश असणारी उच्चस्तरीय समिती स्थापन केली होती. मात्र, अजूनपर्यंत या समितीची एकही बैठक झालेली नाही. त्यामुळे सरकार वाघांच्या मृत्यूची वाट तर पाहात नाही ना?
– किशोर रिठे, सदस्य, राज्य वन्यजीव मंडळ
दहा किलोमीटरचे जंगल क्षेत्र असेल आणि तिथून रस्ता जात असेल तर ते संपूर्ण क्षेत्र वन्यप्राण्यांना मिळेल, अशी योजना हवी. ही संरचना नैसर्गिक हवी म्हणजे वन्यप्राणी कुठूनही रस्ता ओलांडू शकतील. नागपूर-इटारसी मार्ग सातपुडय़ातून जातो, पण तिथे पुलाची उंची जास्त आहे. यामुळे पुलावरून वाहन गेले तरी खाली त्याची जाणीव होत नाही. उत्तम उपाययोजना केल्यास वन्यप्राणी मार्ग सहज ओलांडू शकतात. मुळात ना हरकत प्रमाणपत्र देतानाच या गोष्टी ध्यानात घ्यायला हव्यात.
– प्रफुल्ल भांबुरकर, व्यवस्थापक, मध्यभारत, वाईल्डलाईफ ट्रस्ट ऑफ इंडिया