रस्त्यावरील खड्डे, वाहतूक कोंडीने नागपूरकर त्रस्त
नागपूर : शहरातील रस्त्यांवरील खड्डय़ांमुळे वाहनांच्या गतीला ब्रेक लागला असून अपघातांमध्येही घट झाली आहे. पण, दुसरीकडे अपघातांमध्ये मृत्युमुखी पडणाऱ्यांच्या संख्येत मात्र वाढ झाली आहे.
दोन वर्षांपासून शहरातील रस्ते सिमेंटचे केले जात आहेत. दुसरीकडे मेट्रो रेल्वे व उड्डाणपुलांचे बांधकाम चहुबाजूने सुरू आहे. या कामांसाठी रस्त्यांच्या मधोमध खोदकाम सुरू आहे. काही रस्त्यांवर एका बाजूने वाहतूक बंद करण्यात आली. त्यामुळे दुसऱ्या मार्गाने दुहेरी वाहतूक सुरू आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी ही नित्याची झाली आहे. शिवाय रस्त्यांवर वाहने उभी केली जात असल्याने समस्या अधिक तीव्र झाली आहे. याचा फटका वाहन चालकांना बसतो. यामुळे अपघातही होत आहेत. पण, याची नोंद होत नाही. तर दुसरीकडे मोठय़ा अपघातांचे प्रमाण गेल्यावर्षीच्या तुलनेत कमी झाले आहे. मात्र, अपघातांमध्ये मरणाऱ्यांची संख्या वाढली आहे.
काही महिन्यांपूर्वी शंकरनगर ते अंबाझरी मार्गावर अपघात होऊन तीन मुलींचा मृत्यू झाला होता. त्या अपघातानंतर शहरात विकास कामांविरोधात रोष व्यक्त करण्यात आला होता व कंत्राटदारांनी रस्ते दुरुस्त करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, अद्यापही रस्त्यांवरील खड्डे कमी झाले नाही. कंत्राटदार वाहतूक पोलिसांनी घालून दिलेल्या अटींचे सर्रास उल्लंघन करतात. त्याचा त्रास लोकांना होत असल्याने आता विकास नको, अशी प्रतिक्रिया उमटू लागली आहे.
रिंगरोड परिसरात अधिक अपघात
शहरातील रिंगरोडवर अपघातांचे प्रमाण अधिक आहे. यात प्रतापनगर, एमआयडीसी, वाडी, गिट्टीखदान, मानकापूर, जरीपटका, यशोधरानगर, कळमना, नंदनवन, हुडकेश्वर, अजनी, हिंगणा, कोराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अपघातांचे प्रमाण अधिक आहे.
यंदा १५९ जणांचा अपघातांत मृत्यू
जानेवारी ते ३१ ऑक्टोबर २०१८ या दरम्यान शहरात एकूण ८९२ मोठय़ा अपघातांची नोंद करण्यात आली. गेल्यावर्षी याच काळात एकूण १ हजार सहा अपघात झाले होते. गेल्यावर्षीच्या तुलनेत ११४ अपघात कमी आहेत. मात्र, अपघातांमध्ये मरणाऱ्यांच्या संख्येत यंदा वाढ झाली आहे. यावर्षी १५९ जणांचा अपघातांमध्ये मृत्यू झाला. यात ३२ महिलांचा समावेश आहे. यावेळी ७२४ जण जखमी झाले असून त्यापैकी २३३ महिला आहेत, तर गेल्यावर्षी १५७ जणांचा अपघाती मृत्यू झाला होता.
विकास कामांमुळे रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजवण्यास कंत्राटदारांना सांगण्यात आले आहे. शिवाय महापालिकेकडेही पाठपुरावा केला जात आहे. अपघात कमी करण्यासाठी वाहतूक पोलीस प्रयत्न करीत आहेत. रिंगरोड परिसरात वाहतूक पोलीस अधिक तैनात करण्याचा प्रयत्न आहे.
– राज तिलक रोशन, पोलीस उपायुक्त, वाहतूक.