लोकसत्ता टीम
नागपूर : जुलै महिन्याच्या उत्तरार्धापासून महाराष्ट्रातील विविध भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. पावसाने अद्यापही उसंत घेतली नसून राज्यात ठिकठिकाणी पाऊस सुरूच आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार आणखी दोन दिवस हा पाऊस कायम राहणार असून त्यानंतर पावसाचा जोर काहीसा उतरणार आहे. दरम्यान, राज्यातील काही जिल्ह्यांना आज पावसाचा रेड अलर्ट, ऑरेंज अलर्ट आणि येलो अलर्ट देण्यात आला आहे.
किनारपट्टी तसेच घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम होता. तर विदर्भात देखील अतिवृष्टी, पूरस्थिती निर्माण होऊन काही जिल्ह्यातील गावांचे संपर्क तुटले. दरम्यान, आता पूर्व मध्यप्रदेश आणि छत्तीसगडवरील कमी दाबाचे क्षेत्र जवळजवळ नाहीसे झाले असून वाऱ्याच्या चक्रीय स्थितीत रुपांतर झाले आहे. त्यामुळे विदर्भात पावसाचा जोर थोडा कमी झाला असला तरीही काही जिल्ह्यांमध्ये अजूनही पाऊस कायम आहे.
आणखी वाचा-यवतमाळ जिल्ह्यात पाऊस मुक्कामी! २५ मंडळांत अतिवृष्टी; खुनी नदीला पूर
राज्याच्या किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टी सक्रीय असल्यामुळे या भागात अजूनही मुसळधार पाऊस सुरू आहे. दोन दिवसानंतर पाऊस कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र, घाटमाथ्यावर पाऊस कायम राहण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने आज राज्यातील काही जिल्ह्यांना रेड अलर्ट, ऑरेंज अलर्ट आणि येलो अलर्ट दिला आहे. पुढील ४८ तास पावसाची ही स्थिती कायम राहील, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. आज कोकण किनारपट्टी आणि पश्चिम घाट परिसरात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर रायगड व सातारा जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
अलर्ट देण्यात आलेले जिल्हे कोणते
-रायगड आणि सातारा जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे.
-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, रत्नागिरी, पुणे, मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
-नंदूरबार, धुळे, जळगाव, चंद्रपूर, वर्धा, नागपूर, अमरावती या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.
आणखी वाचा-समाजमाध्यमावरील मैत्री जिवावर बेतली! दिल्लीच्या तरुणीची मूर्तिजापूरात हत्या; कामाच्या शोधात…
पावसाचा जोर आज कुठे?
चंद्रपूर : विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यात पहाटेपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. मुसळधार ते अतिमुसळधार अशा स्वरुपात कोसळणाऱ्या पावसामुळे आजूबाजूच्या गावांमध्ये पुरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. इरई धरणाचे सर्व सातही दरवाजे एक मीटरने उघडण्यात आली आहेत. त्यामुळे नदीकाठच्या गावातील रहिवाश्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
पुणे : पुण्यातील घाटमाथा परिसरात देखील मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस झाला आहे. भोर वेल्हा मुळशी भागात २०० मिलिमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. तर मुळशी धावडी भागात २२९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.