अनिल कांबळे
नागपूर : सध्या ‘फाईव्ह-जी’च्या काळातही ६० टक्के लोक ‘डिजीटल’ साक्षर नाहीत. त्यामुळे सायबर गुन्हेगारांसाठी अनेकजण सहज सावज ठरत आहेत. देशात सायबर गुन्हेगारीत तेलंगणाचा पहिला क्रमांक असून महाराष्ट्र चौथ्या स्थानावर आहे. सायबर गुन्हेगारी रोखण्यात स्मार्ट महाराष्ट्र पोलिसांना अपयश येत असल्याची माहिती समोर आली आहे.
सायबर गुन्हेगारांच्या टोळ्या लोकांच्या ‘डिजीटल’ अज्ञानाचा फायदा घेऊन झटपट पैसा कमावण्याची खेळी करतात. सायबर गुन्हेगार एका दिवसात लाखोंची कमाई करीत असतात. दिल्ली, नोएडा, राजस्थान, छत्तीसगड, मुंबई आणि जामतारा ही शहरे सायबर गुन्हेगारांच्या टोळींसाठी ओळखली जातात. तसेच विदेशातीलही सायबर गुन्हेगार भारतीयांची कोट्यवधीने फसवणूक करीत आहेत. नुकताच केंद्रीय गृहमंत्रालयाने सादर केलेल्या अहवालानुसार, गतवर्षात ५२ हजार ९७४ सायबर गुन्ह्यांची नोंद देशात झाली आहे. त्यात तेलंगणात सर्वाधिक १० हजार ३०३ सायबर गुन्हे दाखल झाल्याची नोंद आहे. तर दुसऱ्या स्थानावर उत्तर प्रदेशचा क्रमांक लागत असून तेथे ८ हजार ८२९ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली. तिसऱ्या स्थानावर कर्नाटक असून ८ हजार १३६ गुन्हे तर चौथ्या क्रमांकावर महाराष्ट्राचा क्रमांक लागतो. महाराष्ट्रात ५ हजार ५६२ गुन्हे दाखल आहेत. सध्याच्या काळात भारतात सायबर गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत आहे.
शासकीय उपाययोजना निष्फळ
गृहमंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, सायबर गुन्हेगारीवर नियंत्रणासाठी सायबर पोलीस तसेच अद्ययावत चौकशी तंत्रे अस्तित्वात आणली. इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (सीईआरटी), डाटा सिक्युरिटी कौन्सिल ऑफ इंडिया (डीएससीआय), सायबर फॉरेन्सिक प्रयोगशाळा आदींची यासाठी स्थापना करण्यात आली. मुंबई आणि पुण्यातही या मोठमोठ्या प्रयोगशाळा अस्तित्वात आहेत. तसेच आता प्रत्येक मोठ्या शहरात स्वतंत्र्य सायबर पोलीस ठाणे आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात यंत्रणा तयार करूनही देशातील सायबर गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहेत.
वृद्ध आणि विद्यार्थी सर्वाधिक लक्ष्य
अनेकांना भ्रमणध्वनीवरून ‘नेट बँकिंग’ किंवा ‘पेमेंट ॲप’ वापरता येत नाही. त्यामध्ये सर्वाधिक वृद्धांचा समावेश आहे. ज्यांना बिल भरताना किंवा ‘एटीएम’मधून पैसे काढताना कुणाचीतरी मदत घ्यावी लागते, असे लोक हमखास सायबर गुन्हेगारांचे लक्ष्य ठरतात. अनेक विद्यार्थी इंटरनेटचा अतिवापर करीत अनेक ‘ॲप्स’मध्ये ‘अकाऊंट’ उघडतात. असे विद्यार्थी सहज जाळ्यात सापडतात.