कार्यालयातील महिला कर्मचाऱ्याला आपल्या कक्षात बोलावून विनयभंग करणाऱ्या गडचिरोली जिल्हा परिषदेतील लेखा व वित्त अधिकाऱ्याला पोलिसांनी अटक केल्याने एकच खळबळ उडाली आहे. ओमकार अंबपकर (५४, रा. कोल्हापूर) असे अटक झालेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे.
हेही वाचा- नागपूर : करोना ओमायक्रॉनच्या ‘एक्स बीबी’चे रुग्ण विदर्भातील तीन जिल्ह्यांत
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला कर्मचारी ही गडचिरोली जिल्हा परिषदेत कार्यरत आहे. आरोपी लेखा व वित्त अधिकारी ओमकार अंबपकर याने १६,१७ व १८ नोव्हेंबरला लागोपाठ तीन दिवस पीडित महिला कर्मचाऱ्याला कार्यालयीन कामाच्या बहाण्याने आपल्या कक्षात बोलावून नको त्या ठिकाणी स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. सततचा त्रास सहन न झाल्याने पीडितेने आरोपी लेखा व वित्त अधिकाऱ्याविरोधात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी सोमवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास शहरातील मुख्य रस्त्यावरुनच अंबपकर याला अटक केली. त्याच्यावर विनयभंगासह अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसारही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.