लोकसत्ता टीम
नागपूर : गेस्ट हाऊसच्या संचालकाला गोळ्या घालून ठार करणारा आरोपी सलमान खानने पोलीस ‘लॉकअप’मध्ये कोठडीत असताना डोक्यावर फरशी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना मंगळवारी सायंकाळी तहसील पोलीस ठाण्यात घडली. सलमानवर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. सलमान खान समशेर खान (२७, हसनबाग) असे आरोपीचे नाव आहे.
२४ ऑक्टोबर रोजी मालमत्तेच्या वादातून मोहम्मद सोहेल उर्फ परवेज मो. हारून याने सलमान खान आणि आशिष बिसेन यांच्या मदतीने जमील अहमद यांची गेस्ट हाउसमध्ये जाऊन हत्या केली होती. या हत्येमुळे खळबळ उडाली होती व आरोपी फरार झाले होते. पोलिसांनी परवेजसह तिघांनाही अटक केली होती. तीनही आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात आली व त्यांची चौकशी सुरू होती. मंगळवारी सायंकाळच्या सुमारास लॉकअपमधून काहीतरी आपटल्याचा आवाज आला. तेथील तैनात पोलीस कर्मचारी लॉकअपजवळ पोहोचले. त्यावेळी सलमान लॉकअपच्या दाराजवळ बसला होता व त्याचे डोके रक्तबंबाळ झाले होते. पोलीस कर्मचाऱ्यांनी तत्काळ वरिष्ठांना या प्रकारांना कळवले.
आणखी वाचा-राज्याच्या शिक्षण सचिवांना अटक करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश; नेमकं झालं काय?
सलमानला लगेच मेयो रुग्णालयात उपचारांसाठी रवाना करण्यात आले. पोलिसांनी तेथे पाहणी केली असता टाईल्सचे तुकडे दिसून आले. सलमानने ‘लॉकअप’च्या शौचालयातील टाईल्स तोडून आत आणली होती. त्या टाईल्सने त्याने स्वत:वर वार केले होते. मात्र, टाईल्स तोडताना आवाज झाला व त्याचा प्रयत्न फसला. या प्रकरणात सलमानविरोधात आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्ह्या दाखल केला.