नागपूर : एका मतीमंद महिलेच्या असहाय्यतेचा फायदा घेऊन बलात्कार करणाऱ्या एका युवकाला पोलिसांनी अटक केली. तो कारागृहात न्यायालयीन कोठडीत होता. त्याला शिक्षा सुनावण्याची प्रक्रिया न्यायालयातून सुरु होती. मात्र, ‘त्या’ बलात्काऱ्याला न्यायालयातून शिक्षा मिळण्यापूर्वीच नियतीनेच शिक्षा दिली. त्या कैद्याचा कारागृहातच आकस्मिक मृत्यू झाला. लिंगेश्वर प्रकाश चार्ली (४०, खलासी लाईन, मोहननगर) असे मृत कैद्याचे नाव आहे.
हेही वाचा : पंतप्रधानांकडून शरद पवारांवरील टीका राष्ट्रवादीच्या पथ्यावर – आर्य
सदरमध्ये राहणारी पीडित महिला मतीमंद असून ती घरी एकटीच राहत होती. तिला बोलता येत नव्हते तसेच कमी दिसत होते. आरोपी लिंगेश्वर याला दारूचे व्यसन होते. त्याची त्या मतीमंद महिलेवर वाईट नजर होती. त्यामुळे तो नेहमी तिच्या घरात घुसून तिच्याशी अश्लील चाळे करीत होता. महिलेला बोलता येत नसल्यामुळे लिंगेश्वरची हिम्मत वाढत गेली. ७ जून २०२३ रोजी रात्री लिंगेश्वर दारुच्या नशेत महिलेच्या घरात घुसला. त्याने घराचे दार आतून बंद केले. त्यानंतर मतिमंद महिलेचा गैरफायदा घेत तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तो दारुच्या नशेत तेथेच झोपी गेला. सकाळी त्या महिलेची मोठी बहिण घरी आली असता लिंगेश्वर नको त्या अवस्थेत घरात झोपलेला दिसला. तिने आरडाओरड केली आणि शेजाऱ्यांना गोळा केले. शेजाऱ्यांनी लिगेश्वरला चांगला चोप दिला व पोलिसांना माहिती दिली.
हेही वाचा : धक्कादायक! प्रियकराने दिला दगा अन् त्याच्या मित्रांनी सर्वस्व लुटले…
आरोपीला सदर पोलिसांनी ८ जूनला बलात्काराच्या आरोपाखाली अटक केली होती. न्यायालयाच्या आदेशानुसार त्याची ११ जूनला मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली. ११ मे २०२४ रोजी त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना उपचारासाठी वैद्यकीय रुग्णालयात पाठवण्यात आले, तेथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. माहिती मिळताच धंतोली पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली.