अमरावती : परसबागेत लावलेले वेल शेळीने खाल्ल्याच्या वादातून एकाने वृद्ध शेजारी शेळी मालकावर कुऱ्हाडीने वार करून त्याची हत्या केली. ही घटना सात वर्षांपूर्वी वलगाव ठाण्याच्या हद्दीतील विर्शी गावात घडली. या प्रकरणी येथील जिल्हा न्यायाधीश (क्रमांक २) पी.जे. मोडक यांच्या न्यायालयाने आरोपीला आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
विधी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आनंदराव सुखदेवराव बडक (५८, रा. विर्शी) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे तर हरिभाऊ शेंद्रे (६५, रा.विर्शी) असे मृताचे नाव आहे. १८ सप्टेंबर, २०१६ रोजी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास भातकुली तालुक्यातील विर्शी येथे ही घटना घडली होती. हरिभाऊ शेंद्रे हे त्यांच्या मालकीच्या शेळ्या घेऊन चरण्यासाठी घेऊन जात होते. त्याचदरम्यान रस्त्यात आनंदराव बडक याच्या परसबागेत असलेल्या कोहळा व वालाचे वेल शेळ्यांनी खाल्ले. ‘तुझ्या बकरीने माझ्या परसबागेतील वेल खाल्ले, त्याची भरपाई कोण देणार, थांब तुला जिवाने मारून टाकतो,’ असे म्हणत आनंदराव बडकने हरिभाऊ यांच्या डोक्यात व पायावर कुऱ्हाडीने वार केले. आरडाओरड होताच आरोपी तेथून पळून गेला. जखमी हरिभाऊ यांना गावातील नागरिकांनी तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात व तेथून उपचासाठी खासगी रुग्णालयात हलवले होते. प्रकृती खालावल्यामुळे त्यांना नागपूरला हलवण्यात आले. मात्र, नागपूर येथे त्यांचा मृत्यू झाला.
या प्रकरणी वलगाव पोलिसांनी सुरुवातीला प्राणघातक हल्ला करणे व हत्येच्या कलमान्वये गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास वलगावचे तत्कालीन ठाणेदार दत्तात्रय गावडे यांनी करून दोषारोपपत्र दाखल केले होते. या प्रकरणी अतिरिक्त सरकारी अभियोक्ता अॅड. कौस्तुभ लवाटे यांनी एकूण दहा साक्षीदार तपासले. घटनेचे प्रत्यक्ष साक्षीदार व सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी आनंदराव बडक याला हत्येप्रकरणी दोषी ठरवून शिक्षा सुनावली.