वर्धा : बनावटी सोन्याचे दागिने देत दहा लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या आरोपीस चौवीस तासांत अटक करण्यास पोलिसांना यश आले आहे. चंद्रपूर येथील कापड विक्रेते नईमोद्दिन मोहिरूद्दिन काजी यांनी या प्रकरणी तक्रार दिली होती.
उमरेडच्या प्रभूलाल सिंग चव्हाण या मजुरी काम करणाऱ्याने खोदकाम करताना दीड किलो वजनाचे सोन्याचे दागिणे सापडल्याचे काजी यांना सांगितले. त्याची किंमत १६ लाख रुपये असल्याचे कळविले. मात्र हा व्यवहार दहा लाख रुपयात पक्का झाला. काजी हे आपला मुलगा परवेजसोबत दहा लाख रुपये घेवून चारचाकीने जाम चौरस्ता येथे आले. याठिकाणी एका चहाच्या टपरीवर काजी यांनी दहा लाख रुपये आरोपी चव्हाण यास देत त्याच्याकडून सोन्यासारखा दिसणारा हार घेतला. मात्र गाडीत बसल्यावर हा हार नकली असल्याचे त्यांच्या लक्षात आले. तेव्हा लगेच त्यांनी समुद्रपूर पोलिसांकडे तक्रार केली.
हेही वाचा – सरकारी नोकरीच्या कंत्राटीकरणाविरोधात हजारो तरुण रस्त्यावर
हेही वाचा – गडचिरोली : भारतमाला परियोजना, समृद्धी महामार्गाला रानटी हत्तींचा धोका
पाेलिसांनी मोबाईल व ईतर माध्यमातून आरोपीचा शोध सुरू केला. अशा प्रकारचे गुन्हे करणारी एक टोळी उमरेड परिसरात सक्रिय असल्याची माहिती मिळाली. तसेच त्यांच्यापैकीच एक असलेला प्रभू चव्हाण हा घटनेच्या दिवशी जाम परिसरात फिरतीवर असल्याची माहिती मिळाली. अखेर त्याचा शोध लागला. आरोपी त्याच्या काकाच्या घरी सापडला. त्याची विचारपूस केल्यावर त्याने गुन्हा कबूल करत लुटलेले दहा लाख रुपयेसुद्धा पोलिसांच्या हवाली केले. त्याच्या दुसऱ्या साथीदाराचा शोध घेणे सुरू आहे.