अकोला: शहरातील रणजीत इंगळे हत्याकांड प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले. स्थानिक गुन्हे शाखा पथकाने दिल्ली येथून आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.
जुने शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये वाशीम वळण मार्गावर १७ जून रोजी मध्यरात्री अनोळखी इसमाने रणजीत इंगळे रा.गिता नगर यांची हत्या केली होती. या प्रकरणी जुने शहर पोलीस ठाण्यात अनोळखी आरोपी विरूद्ध हत्येचा गुन्हा दाखल करून तपास करण्यात आला. या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेने केला. गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न झाल्यावर तो दिल्ली येथे असल्याचे स्पष्ट झाले.
हेही वाचा… भुकेल्या रेल्वे प्रवाश्यांना भोजन देत गावकऱ्यांनी जोपासली माणुसकी, प्रवासी म्हणाले धन्य झालो…
स्थानिक गुन्हे शाखेतील तपास पथकाने दिल्ली येथे दाखल होत हत्या प्रकरणातील आरोपीला कायदेशीररित्या ताब्यात घेतले. आरोपीला अकोल्यात आणून पुढील तपासासाठी जुने शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक संदिप घुगे, अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुभाष दुधगांवकर यांच्या मागर्दशनाखाली पोलीस निरीक्षक प्रदीप शिरस्कार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोउपनि सागर हटवार, अब्दुल माजिद, रवींद्र खंडारे, भीमराय दिपके, संतोष दाभाडे, चालक पोलीस अमलदार अक्षय बोबडे आदींच्या पथकाने केली.