अमरावती : हत्या व प्राणघातक हल्ला प्रकरणातील आरोपीला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. व्ही यार्लगड्डा यांच्या न्यायालयाने जन्मठेप व २० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. ही घटना ८ फेब्रुवारी २०१४ रोजी सकाळी फ्रेजरपुरा ठाण्याच्या हद्दीतील महादेव खोरी येथे घडली होती. ब्रिजेश उर्फ विजय मुलचंद गुप्ता (३७) रा. महादेव खोरी असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. न्यायालयात दाखल दोषारोपपत्रानुसार, महादेव खोरी येथील रहिवासी ऋषिकेश ठाकरे व गौरव इंगोले या दोन मित्रांचा ब्रिजेश गुप्ता याच्यासोबत वाद होता.
घटनेच्या दिवशी ८ फेब्रुवारी २०१४ रोजी सकाळी १०.३० वाजता ऋषिकेश व गौरव हे हातात सायकल घेऊन पायी महादेव खोरी येथून त्यांच्या घरी जात होते. त्यावेळी घरासमोर उभ्या असलेल्या ब्रिजेशने ऋषिकेश व गौरवसोबत वाद घालून त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. ब्रिजेशने तलवार आणून गौरववर हल्ला केला. गौरव इंगोले याने तलवारीचा वार डाव्या हाताने अडवल्याने त्याला गंभीर दुखापत झाली होती. गंभीर जखमी झालेला गौरव भोवळ येऊन खाली कोसळला. त्यानंतर ब्रिजेशने तिच तलवार घेऊन ऋषिकेशचा पाठलाग सुरू केला. काही अंतरावर त्याने ऋषिकेशला गाठले आणि तलवारीने त्याच्या छातीत वार करून त्याची हत्या केली. सदर घटनेनंतर गंभीर जखमी गौरवला रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेबाबत माहिती मिळाल्यावर फ्रेजरपुरा पोलिसांनी गौरवचे बयान नोंदवून ब्रिजेशविरुद्ध गुन्हा दाखल केला.
तपासाअंती दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणात अकरा साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. त्यापैकी एकमेव प्रत्यक्षदर्शी साक्षीदार हा उलट तपासणीमध्ये फितूर झाला होता. साक्षीदारांची साक्ष व सरकारी पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य धरून प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. व्ही. यार्लगड्डा यांच्या न्यायालयाने आरोपी ब्रिजेशला जन्मठेप व २० हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली. सरकारी पक्षाच्या वतीने अतिरिक्त शासकीय अभियोक्ता सुनील देशमुख यांनी यशस्वी युक्तीवाद केला. न्यायालयाने ब्रिजेशला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
या प्रकरणात न्यायालयाने आरोपीला जन्मठेपेच्या शिक्षेसोबतच २० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. २० हजार रुपयांपैकी तक्रारदार व जखमी गौरव इंगोले यांना दहा हजार रुपये, तर उर्वरित दहा हजार रुपये मृत ऋषिकेश ठाकरे याच्या वारसांना देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.