भावाला भेटायला घरी येणाऱ्या मैत्रिणीवर लहान भावाचा जीव जडला. त्याने तिचे अश्लील छायाचित्र इंस्टाग्रामवर प्रसारित करीत तरुणीच्या घरात घुसून एकतर्फी प्रेमातून तिच्यावर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केला. तिने आरडाओरड केल्यामुळे शेजाऱ्यांनी धाव घेतली. मारहाणीच्या भीतीने आरोपी पळून गेला. याप्रकरणी हुडकेश्वर पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली.
हेही वाचा- नागपूर: इंडियन सायन्स कॉंग्रेसमधील ‘स्पेस ऑन व्हील्स’ काय आहे?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हुडकेश्वरमध्ये राहणारी २० वर्षीय तरुणी स्विटी (काल्पनिक नाव) ही बी.एस्सी.च्या द्वितीय वर्षाला शिक्षण घेते. चार वर्षांपूर्वी आरोपी प्रवीण संजय वैद्य (२५, रा. भारतमातानगर) याच्या भावाची वर्गमैत्रीण होती. दोघेही बारावीत असल्यामुळे स्विटी ही प्रवीणच्या भावाकडे अभ्यासाला यायची. त्यामुळे तिची प्रवीणशीसुद्धा ओळख झाली. मित्राचा लहान भाऊ असल्यामुळे तीसुद्धा त्याच्याशी बोलत होती. ती भावाची मैत्रीण असल्यामुळे नेहमी घरी येत होती. दरम्यान, प्रवीणचे तिच्यावर एकतर्फी प्रेम जडले. ती घरी आल्यानंतर तिच्याशी लगट करीत होता. लहान असल्यामुळे ती त्याकडे दुर्लक्ष करीत होती. काही दिवसानंतर तो तिचा पाठलाग करून विनाकारण घरी यायला लागला.
काही दिवसांपूर्वी त्याने तिला प्रेम करीत असून लग्नाची मागणी घातली. बेरोजगार असलेल्या प्रवीणला तिने स्पष्ट नकार दिला. त्यामुळे तो चिडला. तिचे फेसबुक आणि इंस्टाग्रामवरील काही फोटो काढून त्याने स्वत:च्या व्हॉट्सॲपवर ठेवायला लागला. तिने त्याची बऱ्याचदा समजूत घातली. तिला तो प्रेमाचे मॅसेज पाठवायला लागला. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी रात्री आठ वाजता तो स्विटीच्या घरी गेला. त्यावेळी घरी कुणी नव्हते. त्याने संधी साधून तिला शारीरिक संबंधाची मागणी केली. तिने नकार देताच तिच्याशी लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न करायला लागताच स्विटीने आरडाओरड केली. त्यामुळे शेजाऱ्यांनी धाव घेतली. तोपर्यंत तो घरातून पळून गेला. याप्रकरणी तरुणीच्या तक्रारीवरून हुडकेश्वर पोलिसांनी गुन्हा दाखल करून प्रवीणला अटक केली.