अमरावती : अचलपूरचे भाजपचे आमदार प्रवीण तायडे यांनी प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख व माजी आमदार बच्चू कडू यांच्यावर टीका करताना शिवीगाळ केल्याने प्रहारचे कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. प्रवीण तायडे यांच्यावर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी कार्यकर्त्यांनी ग्रामीण पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बहिरम येथे आमदार प्रवीण तायडे यांचे फलक दोन दिवसांपूर्वी अज्ञात व्यक्तींनी फाडून टाकले होते. या घटनेच्या पार्श्वभूमीवर स्वागत सभेत बोलताना प्रवीण तायडे यांची जीभ घसरली. त्यांनी बच्चू कडू यांचा एकेरी भाषेत उल्लेख करीत त्यांना शिवीगाळ केली आणि माझ्या वाटेला जाऊ नका, तुमचे किती कार्यकर्ते आहेत, ते घेऊन या. जागा आणि वेळ ठरवा, मी कुठेही येण्यास तयार आहे, अशा शब्दात आव्हानही दिले. त्यांच्या या भाषणाची ध्वनिचित्रफीत प्रसारीत झाल्यानंतर प्रहारचे कार्यकर्ते संतप्त झाले.

हे ही वाचा… पुरावे नष्ट केल्यावर वाल्मीक कराडचे आत्मसमर्पण, वडेट्टीवारांचा दावा

आमदार प्रवीण तायडे यांनी ३० डिसेंबर रोजी श्रीक्षेत्र बहिरम येथे प्रसारमाध्यमांमध्ये तसेच त्यांच्या सार्वजनिक ठिकाणी केलेल्या भाषणामध्ये बच्चू कडू यांचे विरुद्ध खोटे आरोप, शिवीगाळ आणि मारहाण करण्याची धमकी दिली आहे. त्यांनी वेळ सांगावी व किती कार्यकर्ते असेल त्यांना घेऊन यावे, असे चिथावणीखोर भाषण दोन परस्पर विरोधी पक्षांमध्ये तेढ निर्माण होईल, या दृष्टिकोनातून केले आहे, असे निवेदनात म्हटले आहे.

श्रीक्षेत्र बहिरम येथे आमदार प्रवीण तायडे यांनी लावलेल्या फलक काढण्याशी प्रहार पक्षाच्या कार्यकर्त्याचा अथवा वैयक्तिकरित्या बच्चू कडू यांचा कुठलाही संबंध नसतांना, अशा प्रकारचे आरोप वि‌द्यमान आमदार प्रवीण तायडे यांच्याकडून करण्यात आलेले आहे. त्यामुळे प्रहार पक्षाच्या सर्व कार्यकत्यांच्या भावना दुखावल्या आहेत. वैयक्तिकरित्या बच्चू कडू यांना विनाकारण प्रवीण तायडे यांनी अश्लील भाषेत शिवीगाळ केली आहे. हे वि‌द्यमान आमदाराचे कृत्य बेकायदेशीर असून फौजदारी स्वरूपाचा गुन्हा आहे. त्यामुळे प्रवीण तायडे यांच्या कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

हे ही वाचा… …तर नागपुरातच सापडला असता वाल्मिक कराड!

प्रवीण तायडे यांनी खोट्या मार्गाने विजय तर मिळविला परंतु त्यांना आता हा खोटा मुखवटा रुतत असल्याने त्यांच्याच मुखातून बच्चू कडू व प्रहारच्या कार्यकर्त्याचा रोज शंभर वेळा नामजप केल्याशिवाय दिवस जात नाही. गुन्हेगारी मानसिकतेचे प्रदर्शन त्यांच्या बोलण्यातून होत आहे, असा आरोप प्रहारच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Achalpur bjp mla praveen taide abuse bachchu kadu in speech mma 73 asj