वर्धा : सावंगी येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयाने एक यशस्वी शास्त्रक्रिया पार पाडत दुर्मिळ अशा व्याधीतून तरुणीची सुटका केली आहे.अवघ्या छत्तीस वर्षीय तरुणीला जटील अशा गर्भाशयमुख कर्करोगाचे निदान झाले. एक्स्टर्नल बीम रेडिएशन उपचार करूनही कर्करोग पेशी शिल्लक राहत असल्याने ही अवस्था दुर्मिळ व जटिल अशी होती. अशा अवस्थेत मृत्यूशी झुंज देणाऱ्या या तरुणीवर सावंगी (मेघे) येथील सिद्धार्थ गुप्ता मेमोरियल कँसर हॉस्पिटलमधील रेडिएशन आणि सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट चमूने वेळीच योग्य उपचार करीत रुग्णाची मृत्यूच्या दाढेतून सुटका केली.
चंद्रपूर जिल्ह्यातील रहिवासी उज्ज्वला (बदललेले नाव) ही असह्य वेदनेमुळे सतत त्रस्त होती. गर्भाशयमुखाच्या कर्करोगामुळे ही तरुण रुग्ण मृत्यूशी झुंज देत असताना नातेवाईकांनी तिला जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न सिद्धार्थ गुप्ता मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी भरती केले. तिची अवस्था लक्षात घेऊन रेडिएशन ऑन्कोलॉजी विभागप्रमुख डॉ. तेजश्री तेलखडे यांनी तिच्या आवश्यक चाचण्या केल्या असता गर्भाशयमुखाचा हा कर्करोग दुसऱ्या स्टेजवर असल्याचे निदान झाले.
कर्करोगाची गाठ ६ सेमी इतक्या आकाराची होती. या गाठीवर एक्स्टर्नल बीम रेडिएशन प्रक्रिया करूनही गर्भाशय मुखावर ३ सेमी आकाराची गाठ शिल्लक राहिली होती. बाह्यविकिरण उपचारानंतर (एक्स्टर्नल बीम रेडिएशन) इतकी मोठी गाठ शिल्लक राहणे, ही दुर्मिळ स्थिती मानली जाते. या गाठीमुळे इंट्राकॅविटरी ब्रॅकी थेरेपी म्हणजेच आंतरगर्भाशय विकिरण उपचार करणे अवघड होणार होते. कर्करोगाचे व्यवस्थापन करण्यासाठी डॉ. तेजश्री तेलखडे यांनी रुग्णावर एक्स्टर्नल बीम रेडिएशनद्वारे कर्करोगाच्या अनियंत्रित वाढणाऱ्या पेशींवर उपचार सुरू केले.
मात्र, कर्करोगाच्या काही पेशी गर्भाशय मांसपेशीवर शिल्लक दिसत होत्या. या उपचारात ही दुर्मिळ स्थिती मानली जाते.परिस्थितीचे गांभीर्य ओळखत डॉ. तेजश्री तेलखडे यांच्यासह ऑन्कोलॉजिस्ट चमू पुन्हा नव्याने सज्ज झाली. सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉ. भूषण जाजू, डॉ. तनू प्रधान, डॉ. आदित्य पटेल यांनी आधी शस्त्रक्रिया करून गर्भाशय मुखावरील गाठ शक्य तितक्या प्रमाणात बाहेर काढली. त्यानंतर डॉ. तेजश्री तेलखडे, डॉ. आशिष उके, मेडिकल फिजिसिस्ट डॉ. अनुराग लुहारिया, रेडिओथेरेपी परिचारिका आरती कांबळे या चमूने यशस्वीरित्या इंट्राकॅविटरी ब्रेकिथेरेपी करून शिल्लक राहिलेल्या गाठीला हायडोस रेडिएशन देऊन ही गाठ पूर्णतः बरी केली.
हेही वाचा…यवतमाळ : पोलीस गणवेशात, रुबाबात वावरणारी ‘ती’ प्रत्यक्षात…
डॉ. तेलखडे व तज्ज्ञ चमूने रुग्णाच्या कर्करोगाचे त्वरीत व योग्य निदान करीत आणि अत्याधुनिक उपचारप्रणाली वापरत अकाली मृत्यूच्या दारात पोचलेल्या तरुणीला सहीसलामत परत आणले. ठराविक कालावधीनंतर या रुग्णाच्या पुन्हा सर्व तपासण्या व चाचण्या केल्या असता कर्करोगाची कोणतीही लक्षणे दिसून आली नाहीत व रुग्णाची प्रकृती सुखरूप असल्याचे डॉ. तेजश्री तेलखडे यांनी सांगितले.