प्रायोगिक रंगभूमीवर पदार्पण करून सर्जनशील कलेचे दर्शन घडवण्याचा प्रयत्न शनिवारी विदर्भातील विविध महाविद्यालयांच्या कलाकारांनी ‘लोकसत्ता लोकांकिका’च्या मंचावरून केला. सामाजिक भान असलेले विषय, त्यावर मार्मिक टिप्पणी करणारे संवाद आणि रंगमंचावर व्यक्तिरेखा जिवंत करणारा अभिनय, अशा एखाद्या कसलेल्या कलाकृतीला तोडीस तोड ठरणाऱ्या एकांकिका सादर करत विद्यार्थ्यांनी उपस्थितांसह परीक्षकांचीही मने जिंकली.
‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेची नागपूर विभागाची प्राथमिक फेरी शनिवारी सर्वोदय आश्रमात पार पडली. नागपूर, अमरावती, चंद्रपूर, चिमूर येथील महाविद्यालयांनी या स्पर्धेमध्ये एकांकिका सादर केल्या. सकाळी दहा वाजता स्पर्धा सुरू झाली. सकाळपासून कलाप्रेमींनी एकांकिका पाहण्यासाठी गर्दी करण्यास सुरुवात केली होती. स्पर्धेत एकांकिका सादर करण्यासाठी स्पर्धक महाविद्यालयांची लगबग सुरू होती. नेपथ्य, प्रकाशयोजना आणि संगीताच्या साथीने एकांकिका सादर करायची असल्याने लगबग सुरू होती. या वेळी सादर झालेल्या ‘चित्रांगदा’ आणि ‘जत्रा’ नाटकाने रसिकांची मने जिंकली. बालपणापासून अर्जुनाची पूजा बांधणारी चित्रांगदा निराश होते. चित्रांगदेला राजसत्ता बहाल करणारा तिचा पिता मुलगा होताच तिला सत्तेवरून पायउतार करतो. काळ बदलला असला तरी आजही स्त्री आणि पुरुषामधील हा भेद कायम आहे. या दोन काळांचे जिवंत चित्रण मांडणारी ‘चित्रांगदा’ आणि करोनाकाळातील टाळेबंदीने हातमजुरी करणाऱ्यांची हालअपेष्टा मांडणारी ‘जत्रा’, या दोन्ही नाटकांतून सामान्य माणूस आणि स्त्रीच्या दु:खाची करुण कथा एकांकिकेच्या माध्यमातून फुलवली आहे.
उत्कट संगीत, भारदस्त संवाद आणि पुराणकाळ वाटावा असे नेपथ्य यामुळे या दोन्ही नाटकांनी प्रेक्षकांच्या मनाची पकड घेतली होती. आपल्या शहरातील नाटय़गृहातील रंगमंचावर कला सादर करण्याची संधी या स्पर्धकांना मिळाल्याने स्पर्धकांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. दोन दिवस पार पडलेल्या प्राथमिक फेरीतून पाच एकांकिका अतिशय उत्कृष्ट ठरल्या. आता विभागीय अंतिम फेरी ८ डिसेंबरला लक्ष्मीनगर येथील सायंटिफिक सभागृहात होणार आहे
.विभागीय अंतिम फेरीसाठी निवड झालेल्या एकांकिका
न्यायालयात जाणारा प्राणी – विठ्ठलराव खोब्रागडे कला व वाणिज्य महाविद्यालय नागपूर.
भोमक्या – ललित कला विभाग, रातुम नागपूर विद्यापीठ नागपूर.
जत्रा – सिपना अभियांत्रिकी महाविद्यालय अमरावती.
चित्रांगदा – शिवाजी विज्ञान महाविद्यालय अमरावती.
दाभाडय़ाचा वाद – संताजी महाविद्यालय नागपूर.
प्रायोजक
लोकसत्ता आयोजित ‘सॉफ्ट कॉर्नर’ प्रस्तुत ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धा सहप्रायोजक ‘झी युवा’ आणि ‘टुगेदिरग’च्या सहकार्याने पार पडणार आहे. ही स्पर्धा पॉवर्ड बाय ‘इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड’, ‘केसरी टूर्स’ आणि ‘मे. बी. जी. चितळे डेअरी’तर्फे आहे. साहाय्य ‘अस्तित्व’चे आहे. लोकांकिकेच्या मंचावरील कलाकारांच्या कलागुणांना चित्रपट, मालिकेत संधी देणारे ‘आयरिस प्रॉडक्शन’ टॅलेंट पार्टनर आहेत.