गोंदिया : जिल्ह्यात वाढते अपघात आणि त्यात होणाऱ्या मृत्यूंची संख्या पाहता पोलीस विभागाने हेल्मेट सक्तीची प्रभावी अंमलबजावणी सुरू केली आहे. याअंतर्गत मागील ५० दिवसांत ५ हजारांहून अधिक दुचाकी वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे. पोलीस विभागाने कारवाईचा बडगा उगारताच वाहन चालकही आता हेल्मेटला प्राधान्य देत असल्याचे सुखद चित्र आहे.
एका सर्वेक्षणानुसार १०० दुचाकी चालकांमागे ८० वाहनचालक हेल्मेट वापरत असल्याचे समोर आले आहे. आता उर्वरित २० टक्के दुचाकी चालकांमध्ये जनजागृतीची गरज आहे. पोलीस विभागाकडून वाहन चालकांना हेल्मेट वापरण्याबाबत मार्गदर्शन केले जात आहे. याचबरोबर हेल्मेट न वापरणाऱ्यांवर कारवाईही केली जात आहे. हेल्मेटचा वापर होत असल्यामुळे अपघाती मृत्यूचे प्रमाणही कमी झाल्याचे दिसून येत आहे. मागील वर्षी जुलै महिन्यात रस्ते अपघातात १४ जणांचा मृत्यू झाला होता, यावर्षी याच कालावधीत ९ जणांनी रस्ते अपघातात आपला जीव गमावला आहे. यावरून हेल्मेट सक्तीच्या काटेकोर अंमलबजावणीमुळे अपघातांवर नियंत्रण येत असल्याचे स्पष्ट होत आहे.
हेही वाचा – चंद्रपूर : वेकोलि क्षेत्रात ‘ड्रोन’द्वारे देखरेख ठेवा, हंसराज अहीर यांचे निर्देश
हेही वाचा – अकोला : काकाचा अल्पवयीन पुतणीवर अत्याचार, न्यायालयाने दिली ‘ही’ शिक्षा
दरम्यान, दुचाकी चालकांवर कारवाई करण्यामागचा उद्देश दंड वसूल करणे हा नसून वाहनचालकांमध्ये हेल्मेट वापरण्याबाबत जनजागृती करणे हा आहे. हेल्मेट वापरणे बंधनकारक आहे. सक्तीच्या अंमलबजावणीमुळे आता कुठे १०० चालकांमागे ८० चालकांच्या डोक्यावर हेल्मेट दिसून येत आहे. त्यामुळे अपघातांचे प्रमाणही कमी झाले आहे, असे जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक जयेश भांडारकर यांनी सांगितले.