लोकसत्ता टीम

नागपूर : केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर शहरात वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून ई- रिक्षांवर प्रवासी वाहतूक होत आहे. नागपूर शहर प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून (आरटीओ) होळीच्याच दिवशी या वाहनांची तपासणी सुरू करत कारवाई केली गेली. आरटीओकडून अचानक कारवाई सुरू झाल्यावर वाहन चालकांचे धाबे दणाणले आहे.

नागपूर शहरात १३ हजार ७९१ ई-रिक्षांची नोंदणी करण्यात आली आहे. त्याद्वारे शहरातील विविध भागात प्रवासी वाहतूक केली जाते. ई-रिक्षा या बॅटरीबर चालणाऱ्या वाहनामुळे वायु प्रदुषणात वाढ होत नाही. त्यामुळे या वाहनांना मोटार वाहन कर आणि परवाना अटीपासून सुट आहे. परंतु हे वाहन चालवण्यासाठी चालकाला वाहन चालवण्याचा परवाना, विमासह इतरही काही नियम पाळणे आवश्यक आहे. परंतु हे नियम मोठ्या प्रमाणात नागपुरात धाब्यावर बसवले जात आहे.

दरम्यान शहरातील वाहतुक कोंडी टाळण्यासाठी या वाहनांना बर्डी ते कामठी रोड, बर्डी ते छत्रपती चौक, बर्डी ते हिंगणा, बर्डी ते काटोल नाका, बर्डी ते सावनेर रोड, बर्डी ते नंदनवन, बर्डी ते हुडकेश्वर, बर्डी ते वाडी, बर्डी ते सी. ए. रोड मार्गे भंडारा रोड, बर्डी ते बेसा तसेच सर्व राष्ट्रीय व राज्य महामार्गावर वाहतुकीस प्रतिबंध घालण्यात आला आहे. परंतु सर्रास या मार्गावरही वाहने चालवली जात असल्याने सर्वत्र वाहन कोंडीही बघायला मिळते.

नागरिकांच्या तक्रारीवरून नागपूर शहर आरटीओने होळीच्या दिवशी गुरूवारी (१३ मार्च २०२५) शहरातील विविध भागात काही काळ या वाहनांची तपासणी मोहिम राबवली. त्यात सात वाहनांवर कारवाई करून त्यांना चालान दिले गेले. ही कारवाई पुढेही सुरू राहणार असल्याचे नागपूर शहर आरटीओ किरन बिडकर यांचे म्हणणे आहे. या कारवाईत मोटार वाहन निरिक्षक शब्बीर शेख, तुषारी बोबडे, यश वाघमारे, राहूल वंजारी, तुषार हटवार, केतन बारसागडे यांचा सहभाग होता.

वाहतुकीचे नियम पाळणे आवश्यक

“ई-रिक्षा चालकांकडून क्षमतेहून ज्यादा प्रवासी वाहतुक, वाहन चालवण्याचा परवाना नसतांना वाहन चालवणे, विमा नसतांना वाहन चालवणे, प्रवासी वाहनातुन माल वाहतुक करणे, वाहतुक नियमांचे पालन न करणे योग्य नाही. हा गुन्हा आहे. वाहतुक नियम तोडणाऱ्या ई- रिक्षा विरोधातकारवाई सुरू केली आहे.” -किरण बिडकर, प्रादेशिक परिवहन अधिकारी, नागपूर शहर.