बुलढाणा: लोणार तालुक्यातील हत्ता शिवारातील शेतामध्ये गांजाची झाडे लावली असल्याची धक्कादायक बाब उघड झाली. मंगळवारी रात्री सुरू झालेली ही कारवाई आज बुधवारी सकाळीदेखील सुरू असून गांजाची शेकडो झाडे आढळून आली आहे. झाडांची मोजणी झाल्यावर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
अनिल चव्हाण असे गांजाची समांतर शेती करणाऱ्या बहाद्दर शेतकऱ्याचे नाव आहे. त्याने लोणार तालुक्यातील हत्ता शिवारमधील गट १८१ मध्ये हा प्रयोग केला. याची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा घातला. मेहकरचे एसडीपीओ प्रदीप पाटील, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक लांडे यांच्या मार्गदर्शनात काल रात्री कारवाई सुरू झाली.
हेही वाचा… “अजितदादा बोलले ते चूकच!…” रोहित पवार म्हणतात, “जाहीर निषेध…”
अंधारामुळे धीम्या गतीने, मात्र रात्रभर ही कारवाई सुरू राहिली. झाडांची संख्या शेकडोच्या संख्येत असल्याने बॅटरीच्या मंद उजेडात झाडांची मोजणी करण्यात आली. कडाक्याच्या थंडीत पथकातील कर्मचारी रात्रभर शेतात तळ ठोकून राहिले. आज बुधवारी सकाळी देखील कारवाई सुरूच होती. कार्यवाहीनंतर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. पोलिसांनी अनिल चव्हाण याला ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी करण्यात येत आहे.