अकोला : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाकडून बंडखोरांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे अकोला ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष कृष्णा अंधारे यांच्यासह एकूण आठ जणांना पक्षातून निलंबित केले. पक्षशिस्तीचा भंग केल्यामुळे कारवाई केल्याचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व महायुतीतील घटक पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या विरोधात उमेदवारी दाखल करून पक्षविरोधी भूमिका घेतलेली आहे. महायुती सरकारची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न काही पदाधिकाऱ्यांनी केला. हे कृत्य जाणीवपूर्वक करून पक्षाची शिस्तभंग केली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून बंडखोरांना निलंबित करण्यात येत असल्याचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या आदेशात नमूद आहे.

हेही वाचा – एकाच पक्षातील मतभेद असलेले दोन माजी मंत्री समोरासमोर… एक रुग्णशय्येवर, दुसरा….

यामध्ये प्रदेश उपाध्यक्ष बापू भेगडे, अकोला ग्रामीण जिल्हाध्यक्ष कृष्णा अंधारे, नांदेड उत्तर जिल्हाध्यक्ष विश्वंभर पवार, नांदेड महिला जिल्हाध्यक्ष पूजा व्यवहारे, माजी जि. प. सदस्य ज्ञानेश्वर भामरे, दहिसर तालुकाध्यक्ष ममता शर्मा, तुमसर तालुका अध्यक्ष धनेंद्र तुरकर व युवक प्रदेश सचिव आनंद सिंघीकर यांचा समावेश आहे.

राष्ट्रवादीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष कृष्णा अंधारे यांनी बंडखोरी करून बाळापूरमधून अपक्ष उमेदवारी दाखल केली. बाळापूर मतदारसंघावर महायुतीमधील भाजप, शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी अजित पवार गटाने दावा केला होता. अखेर हा मतदारसंघ शिवसेना शिंदे गटासाठी सोडण्यात आला. शिवसेना शिंदे गटाने भाजपमधून आयात उमेदवार बळीराम सिरस्कार यांना उमेदवारी दिली. त्यांच्या विरोधात बंडखोर कृष्णा अंधारे यांची अपक्ष उमेदवारी आहे. त्याचा मोठा फटका महायुतीच्या उमेदवाराला बसू शकतो. हे लक्षात घेऊन राष्ट्रवादी पक्षाने अखेर आज बंडखोर कृष्णा अंधारे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. आता पक्षात नव्याने जिल्हाध्यक्षांची नियुक्ती केली जाण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – विजय वडेट्टीवार यांचा उमेदवारी अर्ज अवैध? उच्च न्यायालय म्हणाले…

बाळापूरमध्ये काट्याची लढत

राष्ट्रवादीचे कृष्णा अंधारे यांनी बंडखोरी केलेल्या बाळापूर मतदारसंघात काट्याची लढत आहे. मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे नितीन देशमुख, वंचित आघाडीचे नातिकोद्दीन खतीब व शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार बळीराम सिरस्कार यांच्यात तुल्यबळ लढत होण्याचा अंदाज आहे. मराठा समाजातून येणाऱ्या कृष्णा अंधारे यांनी बंडखोरी केल्याने मतविभाजन होणार आहे. त्याचा फटका मविआसह महायुतीला देखील बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. बाळापूरच्या लढतीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Action against rebels district president of akola rural ncp ajit pawar party suspended ppd 88 ssb