सनातन संस्थेच्या विरोधात ठोस पुरावे सापडले तर सरकार करवाई करेल. मात्र, ते पुरावे न्यायालयात टिकणारे हवेत, असे मत राज्याचे महसूल मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी व्यक्त केले. वरूडला एका कार्यक्रमाच्या निमित्ताने गेले असता तेथून नागपूरला परतल्यावर ते पत्रकारांशी बोलत होते.
सनातनवर बंदी आणण्यासाठी विरोधी पक्षांसह काही संघटना मागणी करीत आहेत. गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी सनातन संस्थेवर बंदीची मागणी केली असली तरी त्याच्या विरोधात पुरावे सापडणे आवश्यक आहे. केवळ मागणी आणि निदर्शने कुठल्यागी संस्थेवर बंदी आणता येत नाही. दाभोळकर किंवा पानसरे यांच्या हत्येबाबत सनातनवर आरोप केले जात असताना त्याबाबत कोणीही पुरावे देत नाही. सनातन संस्थेशी संबंधित एका कार्यकर्त्यांची चौकशी सुरू असली आणि त्यात त्याचा सहभाग असेल तर चौकशीअंती समोर येईल आणि दोषी असेल तर त्याच्यावर कारवाई होईल. मात्र, त्या संदर्भातील पुरावे सापडायला हवे ना. सनातन संस्थेवर बंदी आणण्याचा तुर्तास सरकारचा कुठलाही विचार नाही. काँग्रेसनेही त्यांच्या कार्यकाळात सनातन संस्थेवर बंदी आणण्याचा प्रस्ताव आणून तो केंद्राला पाठविला होता. तेव्हा का नाही केली कारवाई, असा प्रश्न खडसे यांनी उपस्थित केला. राज्यातील मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत विचारले असताना तो लवकरच होईल, असे सांगून त्यांनी या विषयावर अधिक बोलणे टाळले.