नागपूर : रस्त्यावर १५ ते २० मित्रांसह भरधाव दुचाकी चालवून ‘स्टंटबाजी’ करताना एक चित्रफित इंस्टाग्रामवर प्रसारित झाली होती. वाहतूक पोलिसांनी त्याआधारे ११ दुचाकीस्वारांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला व त्यांच्याकडून १ लाख १० हजार रुपयांचा दंडही वसूल केला. यापूर्वी, फुटाळा तलावावर दोन कारचालकांनी स्टंटबाजी केल्याची चित्रफित प्रसारित झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली होती, हे विशेष.
२५ जूनला दुपारी आयटी पार्कसमोर आयोजित एका कार्यक्रमातून १५ ते २० दुचाकीचालक बाहेर पडले. रस्त्यावर स्टंटबाजी केली. त्यामध्ये काही युवक हेल्मेट घालून नव्हते तर काहींनी वाहतूक नियमांचे उल्लंघन केले होते. स्टंटबाजीला एका युवकाने ‘इंस्टाग्रामवर लाईव्ह’ केले. ती चित्रफीत समाजमाध्यमांवर प्रसारित होताच. वाहतूक शाखेच्या पोलीस उपायुक्त चेतना तिडके यांनी स्टंटबाजी करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई करण्याचे आदेश दिले.
हेही वाचा – नागपूर : हिंगणा एमआयडीसीत पुन्हा आग, रंग तयार करणाऱ्या कंपनीची मोठी हानी
वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद चौधरी यांनी ११ दुचाकी चालकांचा शोध घेतला. त्यांच्या पालकांसह वाहतूक शाखेत आणले. दुचाकीचालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. पालकांकडून १ लाख १० हजार रुपयांचा दंडही वसूल केला. यानंतर कोणतीही स्टंटबाजी करणार नाही, असे हमीपत्र लिहून घेतले.