नागपूर : उन्हाळी गर्दीच्या हंगामात कर्मचारी तुटवडा टाळण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) नवीन क्लृप्ती शोधली आहे. त्यानुसार महामंडळाकडून कर्मचाऱ्यांची गंभीर प्रकरणे वगळता इतर प्रकरणांमध्ये १५ जूनपर्यंत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कोणतीही कारवाई केली जाणार नाही.
राज्यातील सर्वसामान्य प्रवाशांच्या सार्वजनिक प्रवासाचे प्रमुख साधन असलेल्या एसटी महामंडळात ८० हजारांच्या जवळपास कर्मचारी तर आठशेच्या जवळपास अधिकारी कार्यरत आहेत. एसटी महामंडळाने सध्या उत्पन्न मिळवून देण्याची जबाबदारी चालक व वाहकांवर सोपवली आहे. सद्यस्थितीत राज्यात उन्हाळी गर्दीचा हंगाम सुरू असून सगळ्याच भागात एसटी बसमध्ये प्रवाशांची गर्दी वाढली आहे.
हेही वाचा – पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात ‘या’ नेत्याने थोपाटले दंड; वाराणसीत लोकसभेसाठी अर्ज दाखल
प्रवाशांची गर्दी वाढण्याला मुलांच्या शाळांना सुट्ट्या, लग्नसराईसह इतर कार्यक्रमांची रेलचेल हे प्रमुख कारण आहे. गर्दीचा हंगाम सुरू असतानाही काही एसटी महामंडळांच्या कार्यालयांमध्ये एसटी कर्मचाऱ्यांना किरकोळ कारणावरून शिस्त व आवेदन कार्यपद्धतीअंतर्गत निलंबित करणे अथवा इतरही कारवाई केली जाते. परिणामी, गर्दीच्या हंगामात कर्मचाऱ्यांची मन:स्थिती बिघडून ते उपलब्ध होत नाही. त्यामुळे कर्मचारी तुटवडा होतो. हा तुटवडा टाळण्यासाठी महामंडळाने उन्हाळी गर्दीचा हंगाम पूर्ण होईपर्यंत कर्मचाऱ्यांचे गंभीर प्रकरण वगळता इतर प्रकरणातील प्रथम अपील, घटक- विभागामार्फत करण्यात येणारी कारवाई १५ जूनपर्यंत करू नये, असे स्पष्ट आदेश सर्व एसटीच्या कार्यालय प्रमुखांना दिले आहे. त्यामुळे आधीच विविध प्रकरणांत अडकलेल्या कर्मचाऱ्यांना दीड महिना दिलासा मिळाला आहे.
हेही वाचा – बुलढाणा : ‘राजा कायम’, पीकपाणी साधारण! भेंडवळच्या घटमांडणीचे निष्कर्ष
गंभीर प्रकरणांमध्ये महामंडळाकडून नेहमीच दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाई होते. परंतु, गर्दीच्या हंगामात कर्मचारी तुटवड्याने प्रवाशांना त्रास होऊ नये म्हणून कमी गंभीर प्रकरणात तूर्तास महामंडळाकडून कारवाई होणार नाही. परंतु १५ जूननंतर या प्रकरणांवरही कारवाई होईल. – श्रीकांत गभणे, उपमहाव्यवस्थापक, एसटी महामंडळ.