चोरीच्या गुन्ह्यात पकडलेल्या एका अट्टल चोराला कारवाई न करताच सोडून देणे पोलिसांना चांगलेच महागात पडले आहे. याप्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी पाच पोलिसांवर निलंबनाची कारवाई केली.

१३ ऑक्टोबरच्या रात्री २ वाजतादरम्यान रुपेश गाढवे व आशीष मोहतुरे हे दोघे कोजागिरीचा कार्यक्रम आटोपून घराच्या दिशेने निघाले असता एक अज्ञात व्यक्ती घराच्या भिंतीवरून उडी घेताना त्यांना दिसून आला. संशयावरून दोघांनीही त्याचा पाठलाग केला व त्याला पकडले असता कुलूप तोडण्यासाठीचे चोरीचे साहित्य त्याच्याजवळ आढळून आले. त्यांनी वरठी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुबोध वंजारी यांना याबाबत दिली. घटनास्थळी पथक पाठवून चोरट्याला ताब्यात घेत पोलीस ठाणे वरठी येथे नेण्यात आले. परंतु पोलिसांनी निष्काळजीपणा करत त्या चोराला सोडून दिले. त्याच्याबद्दल माहिती काढली असता सदर आरोपी हा अट्टल चोरटा असल्याचे लक्षात आले. शेखर गुलाब मेश्राम (२६, रा. सिरसघाट) असे त्याचे नाव असून त्याच्यावर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल आहेत.

हेही वाचा >>>भंडारा कारागृहात ‘शोले स्टाईल’ ड्रामा; कैदी चढला झाडावर,‘‘मग झाले असे काही की…”

अट्टल चोरट्याला पकडून देणा-या रुपेश गाढवे व आशीष मोहतुरे दोघांनी दुस-या दिवशी पोलीस टाण्यात जाऊन प्रकरणाबाबत विचारपूस केली असता उडवाउडवीची उत्तर देत दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे गाढवे आणि मोहतुरे यांच्यासह नागरिकांनीही संताप व्यक्त केला. त्यानंतर स्थानिक प्रतिनिधीला सदर घटनेची माहिती देण्यात आली. प्रतिनिधीमार्फत पोलिसांना याबाबत विचारले असता त्यांनाही अशाप्रकारे उडवाउडवीची उत्तर देत दुर्लक्ष केल्याने याबाबतचे वृत्त प्रकाशित करण्यात आले. दरम्यान, पोलीस अधीक्षकांनी या घटनेची गंभीर दखल घेत या प्रकरणात निष्काळजीपणा करणाऱ्या पोलीस हवालदार राजेश बाभरे, सहाय्यक फौजदार गंगाधर कांबळे, हवालदार बकीराम शेंडे, शिपाई रेहान पठाण, नायक शिपाई प्रेमनाथ डोरले, या पाच पोलिसांवर निलंबनाची कारवाई केली. अट्टल चोरट्याला गुन्ह्याची नोंद न करता सोडून देणे पोलिसांना चांगलेच भोवले आहे.x