गोंदिया: वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर वाहतूक पोलिस कारवाई करतातच मात्र गोंदिया वाहतूक पोलिसांनी आगळी वेगळी अशी एक मोहीम सुरू केली आहे की, दुचाकी वाहनांवरील कंपनीचे सायलेन्सर काढून त्या जागी आधुनिक सायलेन्सर बसवून चालविणाऱ्या दुचाकी चालकांवर कारवाई केली जात आहे. या कारवाईत आज ७० हून अधिक वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्या दुचाकींवरील सायलेन्सर काढून ते जप्त करण्यात आले आणि जप्त केलेले सायलेन्सर बुलडोझरच्या सहाय्याने नष्ट करण्यात आले. १३ डिसेंबर रोजी वरील कारवाई करण्यात आली आहे.
गोंदिया जिल्ह्यातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहने भरधाव वेगाने व सायलेन्सरच्या आवाजाने चालविली जात आहेत. अनेक दुचाकी वाहनचालक कंपनीने लावलेले सायलेन्सर काढून त्यांच्या दुचाकींवर बदललेले सायलेन्सर लावून ध्वनी प्रदूषण करत आहेत.अशी वाहने पादचाऱ्यांच्या जवळ येताच ते अधिक सायलेन्सर आवाज सोडतात. त्यामुळे दचकून अपघात होण्याची दाट शक्यता असते. गोंदिया शहरात मॉडिफाईड सायलेन्सर बसवण्याची जणू काही फॅशनच झाली आहे. गोंदिया शहरातील रामनगर भागात असे वाहनचालक मोठ्या प्रमाणात दिसून येतात. गोंदिया वाहतूक पोलिसांनी अशा वाहनचालकांवर कारवाईची मोहीम सुरू केली आहे.
हेही वाचा… जरांगेना १७ डिसेंबरला चंद्रपुरातून ‘उत्तर’… वाचा नेमकी काय आहे तैयारी?
गोंदिया वाहतूक पोलिसांनी माहिती देताना सांगितले की अश्या ७० वाहनचालकांवर दंड म्हणून कारवाई करताना त्यांच्या दुचाकी चालकांकडून बदललेले सायलेन्सर काढून टाकण्यात आले असून ते सायलेन्सर पुन्हा वापरु नयेत या उद्देशाने बुलडोझर खाली नष्ट करण्यात आले आहे. या पुढे असे सायलेन्सर कोणी विक्री करणार त्यांच्यावर सुद्धा कारवाई करण्यात येईल, असेही या माहितीत सांगण्यात आले आहे.
वाहतूक नियम पाळा
आजकाल वाहनचालक दुचाकींना मॉडिफाइड सायलेन्सर लावून ध्वनिप्रदूषण करताना दिसतात. अशा वाहनचालकांमुळे अपघात होण्याची शक्यता असते. कंपनीत बसवलेले सायलेन्सरच वापरा. सुधारित सायलेन्सर वापरणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करण्यात येत आहे. अपघात टाळण्यासाठी वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
किशोर पर्वते,
पोलीस निरीक्षक, जिल्हा वाहतूक पोलीस विभाग गोंदिया.