नागपूर : जाहिरातींचे नवे दर १ एप्रिलपासून लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे शहरातील जाहिरात फलकावर जाहिरात करावयाची असल्यास आता जाहिरातदारांना जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. शिवाय जाहिरात फलकावरील कर न भरल्यास किंवा अवैध फलक लावल्यास कठोर कारवाई करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. १ एप्रिलपासून फलकावरील जाहिरातीसाठीच्या आवश्यक परवाना शुल्कात ६०० टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. यासाठी २५ कोटींच्या महसुलाचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.
जाहिरातीच्या पाच श्रेणी निश्चित करण्यात आल्या आहेत. या पाचही श्रेणींसाठी वेगवेगळे दर आहेत. यामध्ये सर्वसाधारण फलक, प्रकाश योजनेने सज्ज असलेले फलक, प्रकाश योजना नसलेले फलक, वाहनांवर लावण्यात येणारे फलक आणि इतर प्रकारांचा यात समावेश आहे. महिन्याला १३०.२० रुपये प्रतिचौरस मीटर ते ४१५ रुपये प्रतिचौरस मीटर असे दर निश्चित करण्यात आले आहेत. जाहिरात दरात वाढ करण्याचा निर्णय घेतल्यानंतर या विभागाकडून २०२३-२४ या आर्थिक वर्षात होणाऱ्या महसुली लक्षात वाढ होण्याची अपेक्षा आहे. परवाना शुल्कात वाढ करण्याचा निर्णय महाराष्ट्र महापालिका कायदा-२०२२ नुसारच घेण्यात आला आहे. यापूर्वी विभागाकडून २०१७ मध्ये यात वाढ करण्यात आली होती. त्यानंतर सहा वर्षे यात कुठलाही बदल करण्यात आला नाही.
हेही वाचा – ताडोबात २०० पशु, पक्ष्यांचा आवाज काढणारा ‘बर्डमॅन’, पाहा व्हिडिओ..
हेही वाचा – रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाचे : नागपूर मार्गे धावणाऱ्या काही रेल्वे रद्द
२०२२-२३ या आर्थिक वर्षात जाहिरात विभागाकडून जाहिरात फलकाच्या माध्यमातून १०.२० कोटींचा महसूल महापालिकेने प्राप्त केला. हा महसूल आतापर्यंतचा सर्वाधिक होता. यापूर्वी २०२१-२२ मध्ये ६.७५ कोटी रुपयांचा महसूल मिळाला. आता दरात बदल केल्याने यात वाढ होऊन १५ कोटींपर्यंत जाण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे महापालिकेने यंदाच्या आर्थिक वर्षासाठी २५ कोटींचे लक्ष्य निर्धारित केले आहे, अशी माहिती महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.