दोघांना अटक

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रेल्वेच्या ई-तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्यांवर रेल्वे सुरक्षा दलाने आज पुन्हा कारवाई केली आणि दोघांना अटक केली. त्यांच्याकडून एक लाख ७८ हजार रुपये किंमतीच्या ११४ तिकीट जप्त केल्या.

मध्य रेल्वेच्या आरपीएफ गेल्या काही महिन्यात ई-तिकीट विक्रेत्यांविरुद्ध धडक मोहीम राबवली आहे. नागपूर आणि इतरही शहरात कारवाईची व्याप्ती वाढवण्यात आली आहे. वरूड येथे दोन दुकानावर छापे घालण्यात आले आणि ई-तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या दोघांना अटक केली. वरुड येथे ई-तिकीट बनावट युजर आयडीने बुक करून विकले जात असल्याची माहिती आरपीएफला मिळाली. आरपीएफने पथक तयार करून त्याच्यावर पाळत ठेवली. त्यानंतर हे पथक वरुड येथे पोहोचले आणि जैन मंदिरसमोरील कल्पतरू सव्‍‌र्हिसेस या दुकानात छापा टाकला.

दुकानाचे मालक हेमंत घंगारे (३५) यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडे आयआरसीटीसीचा ई-तिकीट विक्रीचा परवाना होता, परंतु त्याने १८ वैयक्तिक व बनावट आयडी तयार केले होते. कारवाईच्या आधीच त्यांनी २० तिकिटे बुक केली होती. त्यांची किंमत ३१ हजार ३१९ रुपये आहे. तसेच त्याच्याकडे बनावट आयडीने काढलेले आणखी ८५ तिकीट सापडले. त्याची किंमत एक लाख ३० हजार रुपये होती. आरोपीने गुन्हा मान्य केला असून त्याच्याकडून संगणक, प्रिन्टर, लॅपटॅप व मोबाईल आणि ४ हजार रोख रक्कम जप्त करण्यात आली.

दुसऱ्या एका प्रकरणात आरपीएफने यावलकर नगर, पेट्रोल पंपमागील आर्या टूर अँड ट्रॅव्हल्सच्या दुकानात धाड घातली. यात  चेतन राऊत  (२९) याला अटक

करण्यात आली. त्याच्याकडे आयआरसीटीसीचा परवाना नव्हता. त्याने नुकतेच दोन ई-तिकीट काढले होते. तसेच यापूर्वी सात तिकीट काढले. त्याची किंमत १७ हजार ४२ रुपये होती.

ऑक्टोबरमध्ये ६९ लाखाची तिकीट जप्त

रेल्वे सुरक्षा दलाने नागपूर आणि इतर शहरात बनावट युजर आयडीद्वारे ई-तिकीट बुक करणाऱ्या आठ जणांविरुद्ध ऑक्टोबर महिन्यात कारवाई केली. त्यात तीन हजार ११० आरक्षित ई-तिकीट सापडले. त्याची किंमत ६९ लाख ४८ हजार २५३ रुपये आहे. तसेच चार लाख ६७ हजार ६४२ रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले, अशी माहिती मध्य रेल्वेचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त ज्योतिकुमार सतिजा यांनी दिली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Action on e ticket black marketers