यवतमाळ : देशातील दुसऱ्या क्रमांकाचा दुर्गोत्सव शहरात साजरा होत आहे. ठिकठिकाणी दुर्गादेवींची स्थापना करून मोठे मोठे देखावे केले जातात. हे आकर्षक देखावे बघण्यासाठी राज्यातील भाविकांची गर्दी होते. रविवारी सुरू होणाऱ्या दुर्गोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतूक कोंडी रोखण्यासाठी जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखेकडून ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ तयार करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दुर्गोत्सवादरम्यान वाहतुकीचे नियम व नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. यवतमाळातील मुख्य रस्त्यावर वाहतुकीची कोंडी निर्माण होवू नये, तसेच रोडवर गंभीर व प्राणांतिक अपघात होवू नये, त्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड यांनी वाहतूक व्यवस्थापनाबाबत अधिसूचनेचा आदेश पारीत केला आहे. रविवार, १५ ऑक्टोबर ते २६ ऑक्टोबरदरम्यान अत्यावश्यक सेवा वगळता जड वाहतुकीस शहरात प्रवेश बंद राहणार आहे. शहरातून बाहेरगावी जाणाऱ्या – येणाऱ्या बसेस, संविधान चौक, एसबीआय चौक मार्गे धामणगाव बायपास शहराबाहेरून जातील. पांढरकवडा रोडकडून येणारी वाहने आर्णी व धामणगाव बायपासने वळविण्यात येणार आहे. आर्णी रोडकडून अमरावतीकडे जाणाऱ्या व येणाऱ्या बसेस, ट्रॅव्हल्स भोयर बायपासने वळविण्यात येणार आहे. नागपूर व पांढरकवडा कडून ये-जा करणारी वाहने धामणगाव बायपासकडून संविधान चौकातून नवीन बसस्थानकाकडे येतील. अमरावती व पुसदकडील वाहने लोहारा मार्गे येतील. घाटंजी, आर्णी मार्गावरील वाहने भोयर बायपास मार्गे लोहाराकडून नवीन बसस्थानकाकडे येतील.

हेही वाचा – अकोला : लोखंडी हातोडी, रॉड, मिरची पूड घेऊन टाकला दरोडा, पोलिसांनी सिनेस्टाईल…

दुर्गोत्सवादरम्यान चारचाकी वाहनांसाठीही प्रवेशबंदी राहणार आहे. आर्णी रोड-दत्त हॉस्पिटल, जांब रोड-पनपालिया टाईल्स, लोहारा रोड-लाठीवाला पेट्रोलपंप, सिव्हील हॉस्पिटल रोड-सर्कीट हाऊस वाय पॉईंट, धामणगाव रोड-एसडीपीओ कार्यालय, पांढरकवडा रोड-रिलायंन्स पेट्रोलपंप, भोसा रोड – वंदे मातरम चौक, गोधणी रोड- अँग्लो हिंदी हायस्कूल चौक, आदी प्रमुख ठिकाणे त्यासाठी निश्चित करण्यात आली आहेत.
दुचाकी वाहनांना महत्त्वाच्या ठिकाणी प्रवेश बंदी राहणार आहे. त्या ठिकाणी बॅरिकेट्स लावण्यात येणार आहे. पाचकंदील चौक, तहसील चौक, शनिमंदिर चौक, लोखंडी पूल, पाटीपुरा चौक, संगम चौक, शारदा चौक, आठवडी बाजार कमान, राणाप्रताप गेट, दारव्हा रोड या स्थळांचा समावेश आहे.

हेही वाचा – घरकुल अनुदानात शहरी, ग्रामीण भेदभाव? अपुऱ्या अनुदानामुळे घरकुले रखडली 

दुर्गोत्सवात वाहतूक कोंडी निर्माण होऊ नये, यासाठी अधिसूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. वाहन चालकांनी नियमांचे पालन करावे. महत्त्वाच्या ठिकाणी बॅरिकेट्स लावण्यात येणार असून, वाहतूक शिपाईदेखील तैनात राहतील. आदेशाचे उल्लंघन केल्यास मोटर वाहन अधिनियम १९८८ चे कलम ११९ प्रमाणे कारवाई करण्यात येईल, असे जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अजित राठोड यांनी सांगितले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Action plan to prevent traffic congestion during navratri major changes in internal traffic in yavatmal nrp 78 ssb