अनिल कांबळे, लोकसत्ता
पोलीस आयुक्तांच्या कडक आदेशानंतरही गोमांस विक्री आणि गोतस्करी सुरू असल्यामुळे गुन्हे शाखेचे युनिट पाच आणि यशोधरानगर पोलीस ठाण्यातील एकूण ४५ पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. मात्र, शहरात सुपारी व्यवसाय, सुगंधित तंबाखू, धान्याचा काळाबाजार आणि क्रिकेट सट्टेबाजांची मुक्त वावर सुरू असतानाही त्यांच्यावर कारवाई का नाही, असा प्रश्न आता विचारला जात आहे.
हेही वाचा >>> अमरावती : वीज चोरांचा धुमाकूळ; अडीच कोटी रुपयांची वसुली
लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुद्धराजा भावंडे, मस्कासाथमध्ये बच्छवाणी आणि तहसीलमध्ये संत्या राठोड याचा गुटखा आणि सुगंधित तंबाखूचा व्यवसाय अजूनही जोरात सुरू आहे. त्यांच्याकडे गुन्हे शाखा आणि पोलीस ठाण्यातील ‘विशेष दूत’ महिन्याकाठी भेटी घेतात. धान्याचा काळाबाजार करणारा जावेद (भानखेडा), सतीश निर्मलपर (तहसील), करीम चावल (सैफीनगर), पापा (बकरामंडी), शेख शकील (नालसाहब चौक), जाहिद (भानखेडा), रहिम चावल (भानखेडा) आणि अमोल (कोष्टीपुरा) यांचा धान्याचा काळाबाजार राजरोसपणे सुरू असल्याची माहिती आहे. त्यांच्याकडेही तपास पथक (डीबी) आणि गुन्हे शाखेच्या पथकांची महिन्यातील ‘बैठक’ ठरलेली आहे. रिजवान, अहमद राजा, किरण, धकाते, बब्बू सिंधी, महाजन, तिरूपती, भोगे, वसीम, चिरा यांच्या अवैध धंद्यांवर पोलिसांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. लखानी, जयस्वाल, रूपेश, अजय भाई, योगेश, सारडा, जुनेजा यांचा हवाला व्यापार लपून-छपून सुरूच आहे.