लोकसत्ता टीम
नागपूर : गेल्या काही दिवसांपासून नागपूरकर बुलेटस्वारांच्या फटाक्यांनी त्रस्त झाले होते. अनेक जेष्ठांनी आणि महिलांनी पोलिसांकडे तक्रारी केल्या होत्या. तसेच काही रुग्णालयांनीही पोलिसांकडे बुलेटच्या फट्ट आवाजाबाबत आक्षेप घेतला होता.
त्यामुळे पोलीस आयुक्तांनी बुलेटच्या फटाक्यांना गांभीर्याने घेत सायलेंसरमध्ये बदल करुन फटाके फोडणाऱ्या बुलेटचालकावर कारवाईचा धडाका सुरु केला. पाच दिवस राबविलेल्या मोहिमेत पाचशेवर सायलेंसर जप्त केले. संविधान चौकात जप्त सायलेंसरवर रोडरोलर फिरवून ते नष्ट करण्यात आले. विशेष म्हणजे, काही सायलेंसर एवढे मजबूत होते की, अनेकदा रोडरोलर फिरवूनही ते वाकले नाही. पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांच्या उपस्थितीत सायलेंसर नष्ट करण्यात आले.
आणखी वाचा-नागपूर : दोन वर्षीय चिमुकलीने आईच्या कुशीत सोडला जीव…
अलिकडे बुलेट चालविण्यापेक्षा फटाके फोडण्याकडे तरुणाईचा कल अधिक वाढला आहे. बुलेटच्या सायलेंसरमध्ये बदल करून रस्त्याने फटाके फोडत जातात. बुलेटच्या फटाक्यामुळे रस्त्यावर वाहन चालवणाऱ्या किंवा पायी जाणाऱ्यांच्या हृदयात मोठी धडकी भरते. अचानक फट्ट असा आवाज झाल्याने समोरचा वाहनचालक दचकतो, त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही गंभीर बाब लक्षात घेता वाहतूक पोलीस उपायुक्त अर्चित चांडक यांनी शहरातील सर्व दहा परिमंडळात मोहिम राबविण्याचे निर्देश दिले.
५ ते ९ जानेवारी या पाच दिवसात वाहतूक पोलिसांनी फटाके फोडणाऱ्या बुलेट चालकांवर कारवाई केली. बदल करून लावण्यात आलेले ४४० सायलेंसर जप्त केले आणि संविधान चौकात रोडरोलरने सायलेंसर तसेच वाहन चालकांवर दंड ठोठावला. सध्या काही वाहन पोलिसांच्या ताब्यात असून मुळ सायलेन्सर आणल्यानंतरच वाहन देण्यात येतील. यानंतरही सायलेंसरमध्ये बदल करून वाहन चालविल्यास पुन्हा अशाच प्रकारची कारवाई राबविण्यात येणार आहे. शहरात अशा प्रकारची ही पहिलीच कारवाई आहे.
आणखी वाचा-किरिट सोमय्यांच्या आरोपानंतर खळबळ… अमरावतीत आता बांगलादेशींच्या…
४४० वाहन चालकांकडून तब्बल ३ लाख ९७ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात याप्रसंगी सह पोलीस आयुक्त निसार तांबोळी, पोलीस उपायुक्त अर्चित चांडक, सहायक आयुक्त कल्पना बाविस्कर, पोलीस निरीक्षक आणि अंमलदार उपस्थित होते. टिळक विद्यालय, धंतोली येथील विद्यार्थीसुध्दा उपस्थित झाले होते.
गॅरेजमालकांना नोटीस बजावणार
शोरूममधून बुलेट खरेदी केल्यानंतर काही मेकॅनिककडे जाऊन त्यात आवश्यक ते बदल करून घेतात. अशा गॅरेजमालकांना नोटीस बजावण्यात येणार सर्वांनी वाहतूक नियमांचे पालन पाळावे. नियम मोडणार्यांवर कठोर कारवाई केली जाते. असा संदेश या माध्यमातून देण्यात आला.
वाहतूक परिमंडळनिहाय कारवाई
सायलेंसरमध्ये बदल करून फटाके फोडणाऱ्या बुलेटचालकावर वाहतूक परिमंडळ निहाय कारवाई करण्यात आली. एमआयडीसी- ४२, सोनेगाव- ४०, सीताबर्डी- ५२, सदर – ७१, कॉटन मार्केट- ३७, लकडगंज – ३१, अजनी ३६, सक्करदरा- ३९, इंदोरा- ३३ आणि कामठी परिमंडळाअंतर्गत ५९ वाहनांवर कारवाई करण्यात आली.