अमरावती : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात विनातिकीट प्रवास करणाऱ्या फुकट्या प्रवाशांविरुद्ध रेल्वेच्या वाणिज्य विभागाने धडक मोहीम सुरू करून ऑक्टोबर महिन्यात एकूण ७४ हजार विनातिकीट प्रवाशांवर कारवाई केली असून त्यांच्याकडून तब्बल ५.६४ कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे. या कारवाईने फुकट्या प्रवाशांचे धाबे दणाणले आहेत.
प्रामुख्याने गर्दीची रेल्वे स्थानके बडनेरा, अकोला, खंडवा, भुसावळ, मनमाड आणि नाशिक या रेल्वे स्थानकांवर तिकीट तपासणी करण्यात आली. रेल्वेकडून सातत्याने तिकीट तपासणीची मोहीम सुरू आहे. या मोहिमेत ऑक्टोबरमध्ये ७४ हजार प्रवासी विनातिकीट प्रवास करताना आढळून आले, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. या मोहिमेतून रेल्वेच्या भुसावळ विभागाला ५ कोटी ६४ लाख रुपयांचा महसूल मिळाला आहे.
हेही वाचा – गोंदिया : लक्ष्मीमूर्ती, पणत्या घडविण्याच्या कामाला वेग; यंदा वाढली मागणी
हेही वाचा – मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी ही मोहीम असावी – नितीन चौधरी
या तपासणी मोहिमेदरम्यान पथकांमध्ये रेल्वे अधिकारी, तिकीट निरीक्षक, वाणिज्य आणि व्यावसायिक अधिकारी वर्ग, रेल्वे सुरक्षा दलाचे जवान यांचा समावेश होता. रेल्वे प्रवाशांनी प्रवासासाठी तिकीट घेऊनच प्रवास करावा, तिकीट खरेदी करण्यासाठी मोठी रांग असेल तर आपला वेळ वाचविण्यासाठी रेल्वेच्या युटीएस ॲपचा उपयोग करावा, योग्य तिकीट खरेदी करून रेल्वे प्रवास करावा, असे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे.