लोकसत्ता टीम
अमरावती : जिल्ह्यातील विविध भागांमध्ये अवैध सावकारीने पुन्हा डोके वर काढले असून सहकार विभागाकडे तक्रारीचे प्रमाण वाढले आहे. गेल्या दोन महिन्यांत तेरा जणांच्या विरोधात कारवाई करण्यात आली आहे.
उपनिबंधक सहकारी संस्था अमरावती तसेच सहायक निबंधक सहकारी संस्था वरुड यांच्या कार्यालयाला मिळालेल्या तक्रारींच्या अनुषंगाने तसेच जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था शंकर कुंभार यांच्या आदेशाने शुक्रवारी जिल्ह्यातील चार सावकारांच्या घरांवर चार विविध पथकांनी छापे टाकले.
भातकुली तालुक्यातील कवठा बहाळे येथील सावकार प्रकाश तुळशीराम बहाळे, घाटोळ वाडी येथील सावकार योगिता राजाराम वानखडे उर्फ योगिता उमेश बोके आणि राजुरा बाजार येथील परवाना धारक सावकार चंद्रकांत रामचरण मालपाणी यांच्या घरावर हे छापे टाकण्यात आले. काही ठिकाणी अवैध सावकारीसंदर्भात संशयास्पद कागदपत्रे आढळून आली आहेत. पथकाने संबंधितांकडून कोरे मुद्रांक, उसनवार पावती, भूखंड खरेदीचे कागदपत्र व अन्य दस्तावेज जप्त केले आहेत. या प्रकरणांमध्ये जप्त केलेल्या कागदपत्रांची पडताळणी महाराष्ट्र सावकारी अधिनियम २०१४ मधील तरतुदीनुसार केली जाणार आहे.
लग्न, शिक्षण, शेती, घर बांधणे, खरेदी यांसारख्या विविध कारणांसाठी शेतकऱ्यांसह नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात कर्ज घेण्यात येते. अनेकदा बँकांकडून कर्ज मिळण्यास अवघड आल्यास सावकारांकडून जादा व्याजदराने कर्ज घेण्याचे प्रकार शहरासह ग्रामीण भागात वाढताना दिसतात. गरजेवेळी पैसे उभे होत असल्याने नागरिकांना बँकांपेक्षा सावकारांकडून पैसे घेण्याशिवाय पर्याय नसतो. त्यामुळेच ही अवैध सावकारी बोकाळल्याचे चित्र आहे.
दोन महिन्यात तेरा जणांविरूद्ध कारवाई
गेल्या दोन महिन्यात अवैधरित्या सावकारी करणाऱ्या तेरा जणांविरूद्ध सहकार विभागाने कारवाई केली आहे. यामध्ये मोर्शीमधील दोन महिला सावकारांसह चार जणांचा समावेश आहे. ३० जानेवारीस अमरावतीमधील मुकूंद पुसतकर,प्रकाश पुसतकर, १४ फेब्रुवारीस मोर्शीतील सुधीर पाचारे व सुनील निंभोरकर व १० जानेवारीस मोर्शीमधील दोन महिला सावकारांविरूद्ध कारवाई करण्यात आली आहे. काही दिवसांपुर्वी अमरावती शहरातील दोन महिलांविरूद्ध अवैध सावकारीच्या विरोधात कारवाई करण्यात आली होती.
मृत सावकाराच्या परवान्यावर अवैध सावकारी
परवानाधारक सावकाराच्या मृत्यूनंतर त्यांच्या परवान्यावर अवैधरीत्या सावकारी करणाऱ्या दोन महिलांविरुद्ध सहकार विभागाने गेल्या महिन्यात कारवाईचा बडगा उगारला होता. अमरावती शहरातील महाजनपुरा परिसरातील आनंदनगर येथील रहिवासी अजय राजू बाबर हे परवानाधारक सावकार होते. त्यांच्या मृत्यूनंतर दोन महिला त्यांच्या परवान्यावर अवैधरीत्या सावकारी व्यवसाय करीत असल्याची तक्रार जिल्हा उपनिबंधकांकडे प्राप्त झाली होती.