वाशीम: दिवाळीच्या दिवसात प्रवाशांची होणारी लूट आणि अवैध प्रवाशी वाहतुकीवर अंकुश ठेवण्यासाठी परिवहन विभाग सतर्क झाला असून १७ दिवसात २१७ खासगी स्लीपर कोच बसेसची चौकशी करून ५९ खासगी बसेसवर कारवाई करण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्यात एका खासगी स्लीपर कोच बसचा अपघात होऊन अनेक प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाल्याने खासगी बसच्या सुरक्षेचा मुद्दा चर्चेत आला होता. त्यातच दिवाळीच्या तोंडावर खासगी बस चालकाकडून प्रवाशांची होणारी लूट टाळण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन विभागातर्फे जिल्ह्यातून जाणाऱ्या खासगी स्लीपर कोच बसेसची तपासणी करण्यात येत आहे.

हेही वाचा >>> भंडारा: वीज बिलाच्या नावाखाली न्यायाधीशांची ३ लाखांनी ‘ऑनलाईन’ फसवणूक

हेही वाचा >>> विदर्भ साहित्‍य संघाच्‍या अध्‍यक्षपदी प्रदीप दाते 

मागील १७ दिवसात तपासण्यात आलेल्या खासगी स्लीपर कोच बसेसपैकी ५९ बसेसवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून १ लाख ७२ हजार १०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. दरम्यान, अधिकचे प्रवास भाडे घेतल्यास संबंधित खाजगी ट्रॅव्हल्सवर मोटार वाहन कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात येईल, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हिरडे यांनी दिली. २१ ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत एसटी महामंडळाचे प्रवास भाडे दर १० टक्के अधिक आकारण्यात येत असल्याने खाजगी प्रवासी भाडे दरापेक्षा १० टक्के अधिक भाडे आकारण्याची खाजगी बस वाहतूकदारांना मुभा परिवहन विभागाकडून देण्यात आली आहे.