नागपूर : अपघाताच्या घटनांमुळे वादग्रस्त ठरलेला नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग सध्या वेगळ्याच कारणांमुळे चर्चेत आहे. तरुण-तरुणी समाजमाध्यमांवर टाकण्यासाठी समृद्धी महामार्गावर ‘रिल्स’ तयार करीत आहेत. मात्र आता असे करणे त्यांच्या अंगलट येण्याची शक्यता आहे. त्यांना यासाठी तुरुंगवासही भोगावा लागू शकतो.
हेही वाचा – नागपुरातील हिवाळी अधिवेशनात धडकणार हलबांचा मोर्चा
हेही वाचा – नागपूर: अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
सध्या सर्वत्र पावसाळी पर्यटनाला जोर आला आहे. नजिकच्या पर्यटनस्थळी जाऊन तरुणाई रिल्स तयार करतात आणि समाजमाध्यमांवर टाकतात. त्यांच्यासाठी आता समृद्धी महामार्ग हे नवीन ‘डेस्टिनेशन’ ठरले आहे. तरुण-तरुणी समुहाने जाऊन तेथे ‘रिल्स’ तयार करताना आढळून आले आहे. महामार्गावर दुचाकीने प्रवास करण्यास बंदी आहे. अनेकदा कारवाईसुद्धा करण्यात आली आहे. तरीही संबधित पाहणी पथकाची नजर चुकवून तरुणांकडून रिल्स केली जाते. या महामार्गावर वाहनांसाठी १२० प्रति किलोमीटर प्रतितास अशी वेग मर्यादा घालून देण्यात आली आहे. त्यामुळे या वेगाने धावणाऱ्या वाहनांच्या मार्गात अडथळे नको म्हणून पोलिसांनी तेथे रिल्स बनवणाऱ्यांवर कारवाईचा इशारा दिला आहे. ५०० रुपये दंड आणि एक महिन्याच्या कारावासाची शिक्षेची त्यात तरतूद आहे.