अकोला : खासगी बससाठी कमाल भाडेदर शासनाने निश्चित केले आहे. तरीदेखील खासगी बस वाहतूकदारांकडून प्रवाशांची लूट केली जात आहे. शासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा अधिक दर आकारल्याचे आढळल्यास नागरिकांनी ऑनलाइन तक्रार द्यावी. अशा आस्थापनांवर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे यांनी दिली.
सध्या सणासुदीचा काळ असल्याने प्रवाशांची प्रचंड गर्दी होत आहे. रेल्वे आरक्षण मिळत नसल्याने प्रवाशांना उपलब्ध होईल त्या माध्यमातून प्रवास करावा लागतो. याचा गैरफायदा खासगी बस वाहतूकदार घेत आहेत. पुणे, मुंबईदरम्यान जाणाऱ्या गाड्यांची मोठी भाडेवाढ करण्यात आली आहे. प्रवाशांची आर्थिक लूट केली जात आहे. याबाबत २७ एप्रिल २०१८ च्या शासन निर्णयाद्वारे राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या संबंधित संवर्गातील टप्पा वाहतुकीचे सध्या स्थितीचे भाडे दर विचारात घेण्यात आले आणि खासगी कंत्राटी परवाना वाहनाचे त्या संवर्गासाठी संपूर्ण बससाठी येणाऱ्या प्रति कि.मी. भाडे दराच्या ५० टक्क्यांपेक्षा अधिक राहणार नाही असे कमाल भाडे दर निश्चित करण्यात आले आहेत. त्यामुळे खासगी ट्रॅव्हलकडून कमाल भाडे दरापेक्षा अधिक भाडे आकारल्यास त्यासंदर्भात dycommr.enf2@gmail.com ई-मेलवर किंवा dyrto.30-mh@gov.in या संकेतस्थळावर तक्रार नोंदवावी, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दुतोंडे यांनी केले आहे. या संदर्भात प्राप्त तक्रारीवर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा – नागपूर : इंस्टाग्रामवरील मित्राकडून तरुणीचे लैंगिक शोषण
हेही वाचा – नागपूर : पोलिसांनी दिली पावणेचार कोटींची दिवाळी भेट, नागरिकांच्या चेहऱ्यावर फुलला आनंद
प्रमाणपत्र नसल्यास दंड
जिल्ह्यातील वाहनधारकांनी वाहनांची प्रदूषण नियंत्रण तपासणी करून घ्यावी. प्रमाणपत्र नसल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे यांनी दिला. केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९ च्या नियम ११५ व ११६ मधील तरतुदीनुसार मान्यताप्राप्त वायू प्रदूषण तपासणी केंद्राकडून वाहनाची वायू प्रदूषण तपासणी करून वाहनाला प्रमाणपत्र देण्याविषयी तरतूद करण्यात आली आहे.
…………….