नागपूर : शहरात पुन्हा करोनाने चिंता वाढवली आहे. जिल्ह्यात करोना वाढत असून बघता-बघता सक्रिय रुग्णसंख्या ४१ वर पोहचली आहे. २४ तासांत आणखी ७ नवीन रुग्ण आढळल्याने आरोग्य विभागातही चिंतेचे वातावरण आहे.जिल्ह्यात सोमवारी २४ तासांत १८२ संशयितांच्या चाचण्या झाल्या. यात एकाच दिवशी ७ जणांना करोना असल्याचे पुढे आले. त्यामुळे जिल्ह्यातील सक्रिय करोनाग्रस्तांची संख्या आता ४१ वर पोहचली आहे.

हेही वाचा >>>गडचिरोली: भामरागड तालुक्यातील दुचाकी रुग्णवाहिकेचा फसवा प्रयोग; प्रसिद्धीसाठी अधिकाऱ्यांची चमकोगिरी

गंभीर संवर्गातील ९ करोनाग्रस्तांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. त्यापैकी २ रुग्ण एम्स, १ मेडिकल, १ मेयो, २ रेल्वे रुग्णालय, ३ रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.जिल्ह्यात रुग्णालयातील दाखल रुग्ण वाढत असल्याने आरोग्य विभागात चिंता वाढली आहे. हा आजार वाढू नये म्हणून तातडीने नागरिकांनी मुखपट्टीचा वापर करून शारीरिक अंतराच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे. परंतु महापालिकेचा आरोग्य विभाग शांत दिसत असल्याने ते कामाला कधी लागणार, हा खरा प्रश्न आहे.

हेही वाचा >>>नागपूर: मूत्रपिंड प्रत्यारोपणाला अडचणींचा थांबा!

७५ टक्के रुग्ण शहरातील
सोमवारी शहरात ६ आणि ग्रामीण भागात १ असे एकूण ७ करोनाग्रस्त आढळले. त्यामुळे जिल्ह्यातील सक्रिय रुग्णसंख्या ४१ वर पोहचली आहे. त्यापैकी ७५ टक्के म्हणजे ३३ रुग्ण शहरातील तर ६ रुग्ण ग्रामीणचे आहेत. २ रुग्ण जिल्ह्याबाहेरील असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सकांच्या अहवालातून पुढे आले आहे.

“जिल्ह्यात करोना प्रतिबंधात्मक लसीकरण चांगले झाल्याने नागरिकांमध्ये करोनाविरोधात लढण्याची प्रतिकारशक्ती उत्तम आहे. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. परंतु नागरिकांनी मुखपट्टीचा वापर वाढवणे, शारीरिक अंतर राखण्यासह इतर नियम पाळणे आवश्यक आहे. त्यातूनच आजार नियंत्रणात राहिल.”- डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा शल्यचिकित्सक.

Story img Loader